वाचनामुळे मानवी संवेदना विकसित होतात : आशिष पाटील राजूरकर

वाचनामुळे मानवी संवेदना विकसित होतात : आशिष पाटील राजूरकर

उदगीर (एल.पी.उगीले) : मानवी जीवनात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व असून वाचनाला कुठलाही पर्याय नसतो. वाचनामुळे मानवी मेंदुच्या कक्षा रुंदावतात, माणूस वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ होतो, वैचारिक प्रगल्भतेमुळे माणूस गंभीर होतो, त्याला समाजभान येते. तो स्वतः सोबतच इतर माणसाचा व समाजाचाही विचार करू लागतो, त्याचा विवेक जागृत होतो. व तो चांगल्याचा पुरस्कार, वाईटाचा धिक्कार करू लागतो. एकूणच वाचनामुळे मानवी संवेदना विकसित होतात, असे मत आशिष पाटील राजूरकर यांनी व्यक्त केले.
ते शिवाजी महाविद्यालयात ग्रंथालय व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचन प्रेरणा अभियानांतर्गत आयोजित विशेष कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर.एम. मांजरे होते. तर व्यासपीठावर ग्रंथपाल डॉ. व्ही.एम. पवार, रा.से. यो. कार्यक्रमाधिकारी डॉ. एस. व्ही. शिंदे, छात्र भारतीचे अजित शिंदे उपस्थित होते. पुढे बोलताना राजुरकर यांनी मी व माझे वाचन या विषयावर मार्गदर्शन केले. इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असताना मी वाचनाकडे कसा वळलो ? व वाचनामुळे मी कसा समृद्ध झालो. यावर त्यांनी प्रकाश टाकला.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. आर. एम.मांजरे यांनी विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या कक्षा वाढवण्यासाठी जास्तीत जास्त वाचन करावे, असा संदेश दिला. डॉ. व्ही. एम. पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म्हटले, ग्रंथालय हा महाविद्यालयाचा आत्मा असतो. तसेच ग्रंथालय विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या वाचन प्रेरणा अभियानाची माहिती दिली. कार्यक्रमाधिकारी प्रा. बालाजी सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर डॉ. एस. व्ही. शिंदे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा. ए एस टेकाळे, नितीन शेंडगे, तुकाराम चौधरी यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी परिश्रम घेतले .याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!