महात्मा फुले महाविद्यालयात नोकरीच्या संधी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगार आणि नोकरीच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी येथील महात्मा फुले महाविद्यालयात ‘नोकरीच्या संधी’ ही कार्यशाळा घेण्यात आली.
महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक साई रेड्डी ऐनलवार, सहसंचालक सायना करगुटे, भूषण तलवारे तसेच हिंदुस्तान स्काऊट अँड गाईडचे व्यवस्थापक कृष्णा घोडके, नितीन सूर्यवंशी नागेश गुट्टे आदी उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रारंभी साई रेड्डी ऐनलवार आणि भूषण तलवारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बॅंक फायनान्सच्या क्षेत्रात कोणकोणत्या रोजगार संधी उपलब्ध आहेत याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर हिंदुस्थान स्काऊट अँड गाईडचे मार्गदर्शक कृष्णा घोडके आणि नितीन सूर्यवंशी यांनी स्काऊट अँड गाईडच्या क्षेत्रामध्ये तसेच इतर संरक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेऊन नोकरीच्या उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली.
या कार्यशाळेचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी सतत नव नवीन प्रशिक्षण घेऊन रोजगार आणि नोकरीचा शोध घेत आपल्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे असे प्रतिपादन केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. सचिन गर्जे यांनी केले तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी.डी.चौधरी यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.