उदगीरच्या नविन बस स्थानकाचे काम तात्काळ सुरु करण्यासह उदगीर ते औरंगाबाद ही रातराणी बससेवा सुरु करा – आ.बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : शहर हे तीन राज्याच्या सीमेवर असल्याने आंध्रा, कर्नाटक, महाराष्ट्र आदी ठिकाणाहून दररोज लाखो प्रवासी व शेकडो विद्यार्थी महामंडळाच्या बसने पाहिजे त्या ठिकाणी पोहोचत असतात. मात्र उदगीर शहरातील बस स्थानकाची दुरावस्था होऊन जुनी इमारत जिर्ण झाली आहे.व जुन्या बसस्थानकाच्या इमारतीमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. उदगीर – जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी पाठपुरावा करून उदगीरला नवीन अद्यावत बसस्थानक व्हावे, या मागणीसाठी गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा करत होते. या बसस्थानकाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच नविन बसस्थानकाचे काम होणार असल्याचे आ. संजय बनसोडे यांनी सांगितले.
महामंडळाचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने हे लातूर येथे आले असता उदगीर मतदार संघाचे आ. संजय बनसोडे यांनी त्यांची भेट घेवुन मतदार संघातील एस.टी. बसच्या संदर्भातील अडचणी संदर्भात सविस्तर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने उदगीर शहरातील नविन बसस्थानकाचे काम त्वरित करावे. उदगीर ते औरंगाबाद रातराणी बस सेवा सुरु करावी. महामंडळाच्या नविन बसगाड्या उदगीर ते नांदेड या व्हाया जळकोट मार्गे सोडाव्यात, जेणे करुन मतदार संघातील नागरिकांच्या सोईचे होईल.
कोरोना काळात महामंडळाच्या बस गाड्या ह्या थांबूनच होत्या. त्यामुळे काही खराब झाल्या तर काही मोडकळीस आल्या असल्याने उदगीर आगारात जुन्या बसच्या ठिकाणी नविन बसगाड्या उपलब्ध करुन द्याव्यात. यासह कर्मचाऱ्यांच्याही पगार व इतर अडचणी संदर्भात आ. संजय बनसोडे यांनी महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी लातूरचे विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव, यंत्र अभियंता सेवाराम हेडावु, विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख, उपयंत्र अभियंता जफर कुरेशी, महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस ( इंटक) चे विभागीय सचिव विजय बनसोडे, लातूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळकोट तालुका अध्यक्ष अर्जुन आगलावे, दावणगावचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, प्रा. श्याम डावळे, अॅड. तात्या पाटील, अनिरुद्ध गुरुडे, इब्राहिम देवर्जनकर आदी उपस्थित होते. मागील आठवड्यात आ.बनसोडे यांनी उदगीर येथील जुन्या बसस्थानकाच्या परिसराची पाहणी करुन तेथील अडीअडचणी समजून घेतल्या व प्रवाशांसोबत संवाद साधला होता.