उत्कृष्ट अनुवादासाठी दोन्ही भाषेचे ज्ञान आवश्यक – डॉ. पांडुरंग चिलगर
अहमदपूर (गोविंद काळे) : अनुवाद ही जशी एक कला आहे, तसेच ते एक शास्त्रही आहे. अनुवादकाच्या अंगी विशिष्ट गुण असावे लागतात. साहित्याच्या ज्या प्रकाराचा अनुवाद करायचा आहे, त्या साहित्यप्रकाराची संपूर्ण माहिती अनुवादकाला असावी लागते. तसेच स्त्रोत भाषा आणि लक्ष्य भाषा या दोन्ही भाषांची प्रकृती, प्रवृत्ती आणि संस्कृतीही अनुवादकाला अवगत असावी लागते , असे प्रतिपादन हिंदीचे समीक्षक तथा अनुवादक महात्मा फुले महाविद्यालयाच्या हिंदी विभागातील प्रा .डॉ . पांडुरंग चिलगर यांनी केले .
येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित ‘मराठी राजभाषा गौरव दिना’च्या कार्यक्रमानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतांना डॉ.चिलगर बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ .दुर्गादास चौधरी यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाचे संयोजक डॉ. अनिल मुंढे, डॉ. मारोती कसाब हेही विचार मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. पांडुरंग चिलगर म्हणाले की , मराठी भाषेत इतर भाषांतून साहित्य मोठ्या प्रमाणात भाषांतरित होत आहे ही चांगली गोष्ट आहे; त्याच बरोबर मराठी साहित्यही इतर भाषांमध्ये भाषांतरित झाले तर मराठी ही ज्ञानभाषा होऊ शकते, यासाठी दर्जेदार मराठी साहित्य निर्माण होणे आवश्यक आहे आणि आणि त्या साहित्याची देशपातळीवर चर्चाही होणे अपेक्षित आहे असेही ते म्हणाले . प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांच्या “सावली सावली ऊन दे” या मराठी ललित ग्रंथाचे डॉ. पांडुरंग चिलगर यांनी हिंदी मध्ये ” छांव छांव धूप दो” हे भाषांतर केले असून, हे भाषांतर करतानाचे अनुभव कथनही डॉ. चिलगर यांनी याप्रसंगी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी प्राचार्य डॉ . वसंत बिरादार पाटील म्हणाले की, भाषांतर म्हणजे एका कुपीतले अत्तर दुसऱ्या कुपीत ओतण्यासारखे असते.अनुवादक हा प्रतिभाशाली असतो. रसिकवृतीचा असतो.अनुवाद करतांना जर एखादा अवघड शब्द आला की त्याला क्षणभर नाही तर बराचवेळ पर्यायी शब्द सुचे पर्यंत थांबावे लागते, असे म्हणून
जागतिक क्षेत्रात मराठीतील अनेक ग्रंथ भाषांतरित होत असून, देशातील अनेक विद्यापीठांमध्ये मराठी शिकवताना भाषांतरावर अध्यापन केले जाते. अनुवादाच्या माध्यमातून मराठी साहित्य जगातील विविध भाषांमध्ये भाषांतरित करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न झाले पाहिजेत. तसेच मराठी लेखकांनीही आपले साहित्य जागतिक साहित्याच्या स्पर्धेत कसे उतरेल हे पाहिले पाहिजे असेही ते म्हणाले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘आविष्कार’ या भित्तीपत्रकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, डॉ. मारोती कसाब यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर सूत्रसंचालन कु.संजीवनी येडले हिने केले. आभार कु.पूजा देशमुख हिने मानले. या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.