जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला गती – संजय बनसोडे
उदगीर (एल. पी. उगिले) उदगीर विधानसभा मतदारसंघांतर्गत उदगीर आणि जळकोट तालुक्यातील कृषी, शिक्षण, आरोग्य, क्रीडा या क्षेत्रातील विकास कामांना गती देण्याच्या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक प्राधान्य क्रमाने करण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली असून अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे.
लातूर जिल्हा हा शिक्षण पंढरी म्हणून ओळखला जात असून त्यासोबतच आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सुविधा देखील पुरवण्याच्या दृष्टीने जिल्हा अग्रेसिव असून कृषी आणि क्रीडा क्षेत्राच्या संदर्भातही तसेच पंचायत राज, ग्रामविकास या अनुषंगाने देखील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न पालकमंत्र्याच्या माध्यमातून सुरू केला आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह खा. सुधाकर शृंगारे, खा. ओमराजे निंबाळकर, माजी गृहराज्यमंत्री तथा आ. संजय बनसोडे, आ. बाबासाहेब पाटील, आ. अमित देशमुख, आ. रमेश कराड, आ. विक्रम काळे, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. धीरज देशमुख, आ. अभिमन्यू पवार यांच्यासह जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह विविध कार्यालयीन अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कौशल्याच्या विकासासाठी तालुका स्तरावरील क्रीडा संकुलाच्या निधीत पाचपट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच क्रीडा पटूंच्या सोयीसाठी जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या ही सूचना करण्यात आल्या. त्यासोबतच गाव तिथे स्मशानभूमी आणि दफनभूमीसाठी शासकीय जागा उपलब्ध असलेल्या गावांमध्ये स्मशानभूमीचे शेड उभारण्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ही घोषणा पालकमंत्र्यांनी केली. यासोबतच जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतागृहाचा निधीदेखील वाढवण्यात आला असून शाळांच्या संरक्षण भिंती, वर्ग खोल्यांची दुरुस्ती, निजामकालीन शाळांचा विकास. याचाही आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला.
उदगीर तालुक्यातील तसेच जळकोट येथील सामाजिक न्याय विभागाचे वस्तीगृह तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. यासोबतच 50 अतिरिक्त वीज रोहित खरेदी करण्यासंदर्भात त्यांनी संबंधित खात्यांना सूचना केल्या आहेत. विज हा शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असून कृषी पंपांना नियमित वीज पुरवठा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. नादुरुस्त वीजरोहित्र त्वरित बदलण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अतिरिक्त पन्नास वीजरोहित्र त्यांची खरेदी करण्याची कारवाई तातडीने सुरू करण्याच्या संदर्भात निधी उपलब्ध करून देण्यात येईल. असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
त्यासोबतच रोहित्रा साठी आवश्यक असणाऱ्या इंधनाच्या संदर्भात संबंधित खात्याला त्यांनी फोन करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वीज योग्य प्रमाणात मिळावी, यासाठी रोहित्रा साठी लागणारा इंधनाचा पुरवठा वेळेवर आणि योग्य प्रमाणात केला जावा, अशी सूचना केल्या. ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्राच्या अपूर्ण इमारती त्वरित पूर्ण कराव्यात. चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात देखील त्यांनी सूचना केल्या. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासोबतच प्रमुख महामार्गाच्या कामासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले.
उदगीर नगरपालिका नगरुत्थान आणि दलित वस्ती सुधार योजनेतून अधिक निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात तसेच जळकोट येथील सामाजिक न्याय भवन वस्तीगृह इमारतीचा प्रश्न उपस्थित करून तो लवकरात लवकर मार्गी लावावा. अशी आग्रही मागणी आपण केली असल्याचेही याप्रसंगी आ. संजय बनसोडे यांनी सांगितले.