जबरीने चोरी करून मोबाईल मोटरसायकल पळवणारे गजाआड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
लातूर (एल.पी.उगीले) : जिल्ह्यात भुरट्या स्वरा वाढलेल्या असतानाच काही चोरटे जोर जबरदस्ती करून नागरिकाकडून मोबाईल तसेच किमती वस्तू व मोटारसायकली घेऊन पसार होत होते. अशा प्रकारच्या गुन्ह्याला देखील प्रतिबंध झाला पाहिजे. नागरिकांचे समाधान झाले पाहिजे यासाठी नूतन जिल्हाप्रमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसला पाहिजे या दृष्टी प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नाला यश आले असून पोलिसांनी जबरीने मोबाईल हिसकावून घेणाऱ्या चोरट्यांना गजाआड केले आहे.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 30/10/2022 रोजी पोलिस ठाणे शिवाजी चौक येथे दाखल झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता वरिष्ठांचे मार्गदर्शनात तपास पथकाद्वारे गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू केला असताना दिनांक 03 /11/ 2022 पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या गुन्हे तपास पथकातील पोलिसांना माहिती मिळाली की, दिनांक 30 /10 /2022 रोजी रात्री 11:45 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या दोन तरुणांनी कुणालातरी फोन लावण्याचा बहाना करून फिर्यादी कडील मोबाईल मागून घेऊन फिर्यादीला हिसका मारून जबरदस्तीने मोबाईल घेऊन मोटरसायकल वरून निघून गेले ते दोन इसम लातूर शहरातील इंदिरा नगर व बस्तापुर नगर येथील राहणारे आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली.
सदरच्या माहितीची शहनिशा करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात माहिती मधील ठिकाणी पोलीस पथक पोहोचले. व त्यांना त्यांचे राहते घरातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव
पवन सिद्धेश्वर कांबळे (वय 23 वर्ष, राहणार इंदिरा नगर, लातूर), विशाल गौतम जोगदंड, (वय 19 वर्ष, राहणार बस्तापुर नगर, लातूर)असे असल्याचे सांगितले.
त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन आढळून आला. सदर मोबाईल फोन बाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की,आम्ही सदरचा मोबाईल देशीकेंद्र शाळेच्या जवळून एका मुलास दमदाटी करून हिसकावून घेऊन चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून नमूद आरोपींना पोलीस ठाणे शिवाजी चौक येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर क्रमांक 447/2022 कलम 392, 34 भा.द.वी. मध्ये अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल व चोरीचा 01 मोबाईल असा एकूण 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे शिवाजी चौक चौक पोलीस अमलदार चौगुले हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन,उपविभागीय पोलीस अधिकारी, (लातूर शहर) जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात,पोलीस ठाणे शिवाजी चौक येथील पोलीस निरीक्षक दिलीप डोलारे यांचे नेतृत्वात पोलीस तपास पथकातील पोलीस अमलदार अशोक चौगुले, गोविंद चामे ,युवराज गिरी, संदेश सन्मुखराव यांनी केली आहे.