हातभट्टीच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा पावणेदोन लाखांचे रसायन जप्त
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील कासार शिरशी उदगीर ग्रामीण रेणापूर या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू बनवून ती ग्रामीण भागात आणि शहरात मोठ्या प्रमाणात वितरित केले जाते. ही बाब बऱ्याच पोलिसांना माहिती असून देखील फारशा गांभीर्याने या बाबीकडे पोलीस पाहत नव्हते, हा विषय राज्य उत्पादन शुल्क विभागाचा असल्याचे सांगून पोलीस नामा निराळे होत होते. मात्र नूतन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी या बाबीकडे बारकाईने लक्ष देऊन सर्व पोलिसांना आदेशित केल्यानंतर निलंगा तालुक्यातील कासार शिरशी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत दारू अड्ड्यावर धाड टाकून एक लाख 70 हजाराहून अधिक रुपयांचा हातभट्टीची दारू बनवण्याचे रसायन जप्त करून नष्ट केले आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, लातूर जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी, निलंगा दिनेश कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे कासारशिरशी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवनाथ डमाळे यांच्या नेतृत्वाखाली कोराळवाडी येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणारे 06 इसमावर पोलीस ठाणे कासारशिरशीच्या पथकाने दिनांक 04/11/2022 रोजी सकाळी छापामारी केली.
यामध्ये 2,600 लिटर रसायन ,साहित्य,हातभट्टीची दारू असा एकूण किंमत 01 लाख 70 हजार रुपये चे रसायन,हातभट्टीदारू आणि हातभट्टी निर्मिती चे साहित्य नाश करण्यात आले आहे.या कार्यवाहीत साहेबा महादू कानडे , (रा. कोराळवाडी), संजय गोविंद पाटील (रा. कोराळवाडी), राम अण्णाराव सबदाडे , (रा. कोराळवाडी), नामदेव श्रीमंत सबदाडे , (रा. कोराळवाडी), व्यंकट दौलाप्पा रेवणे , (रा. कोरडवाडी), दत्तू गुंडाप्पा बुकले , (रा. कोराळवाडी. अशा एकूण 06 आरोपीवर पो.ठाणे कासारशिरशी येथे कलम 65(फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे एकूण 06 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे कासारशिरशी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवनाथ डमाळे, पोलीस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर, पोलिस अमलदार घोरपडे, तपसे, नरवटे ,भोंग, सोनटक्के ,इंदापुरे यांनी केली आहे.