आई-वडिलांचे प्रेम विकत मिळत नाही या प्रेमाचे मोलही होऊ शकत नाही – आ रमेशआप्पा कराड

आई-वडिलांचे प्रेम विकत मिळत नाही या प्रेमाचे मोलही होऊ शकत नाही - आ रमेशआप्पा कराड

लातूर (एल.पी.उगीले) : आई वडील कष्ट करून मुलांना लहानाचं मोठं करतात, मात्र त्यांच्या कष्टाचं मोल काहीजण करत नाहीत. आई वडील गेल्यावर निश्चित त्यांची उणीव भासते. समोर नसताना त्यांची जाणीव होते. असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी केले.
लातूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबा यांच्यासह वृद्धाश्रमाचे हितचिंतक यांच्या समवेत दीपावली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड, जेष्ठ पत्रकार प्रदीपजी नणंदकर, सौ. संजीवनीताई कराड, मातोश्री वृद्धाश्रमाचे अध्यक्ष डॉ. महेश देवधर यांची प्रमुख उपस्थिती होती, या मंगलमय कार्यक्रमास पद्मभूषण डॉ अशोककाका कुकडे, डॉ जोत्सनाताई कुकडे, नितीन शेटे, अरुण अंधोरीकर यांच्यासह विवेकानंद प्रतिष्ठान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे पदाधिकारी लातूर शहरातील विविध क्षेत्रातील वृद्धाश्रमाचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, आजी आजोबांना वृद्धाश्रमात येण्याची वेळ का आली ? मुलांना, नातवांना संस्कार करण्यात आपण कमी पडलो का ? असा प्रश्न उपस्थित करून ज्या ज्या वेळी मी इथं आलो, तेव्हा आजी आजोबाचे प्रेम पाहून मनाला वेदना झाल्या. मात्र या वृद्धाश्रमातील आनंददायी वातावरण पाहून मंदिरात गेल्याप्रमाणे आत्मिक समाधान लाभते. मातोश्री वृद्धाश्रम ऐवजी विवेकानंद आनंदश्रम असे नामकरण करावे अशी सूचना त्यांनी केली.
प्रारंभी डॉ. महेश देवधर यांनी वृद्धाश्रमाच्या उभारणी पासून आत्तापर्यंतच्या प्रवासाची सविस्तर माहिती दिली, तर पत्रकार प्रदीप नणंदकर यांनी आपले विचार व्यक्त करून प्रत्येकानी वृद्धाश्रमातील आजी आजोबा साठी वेळ द्यावा, अशी विनंती केली. सुरुवातीला नाट्यस्पंदन प्रतिष्ठान लातूर यांच्या वतीने संगीताचा कार्यक्रम झाला. कार्यवाह गंगाधर खेडकर यांनी आभार मानले.

About The Author