डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या समाधी खोदून अस्थी ठेवलेली अष्ट धातूची पेटी अज्ञातांनी पळवून नेल्याचा विश्वस्त मंडळाचा गंभीर आरोप, पोलिसात तक्रार दाखल

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या समाधी खोदून अस्थी ठेवलेली अष्ट धातूची पेटी अज्ञातांनी पळवून नेल्याचा विश्वस्त मंडळाचा गंभीर आरोप, पोलिसात तक्रार दाखल

लातूर (प्रतिनिधी) : अहमदपूर तालुक्यातील भक्ती स्थळ येथील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची समाधी खोदून महाराजांच्या पवित्र अस्थी तसेच अस्थी ठेवलेली पेटीच अज्ञातांनी पळवून नेल्याचा आरोप विश्वस्त मंडळाने केलाय. त्यामुळे खळबळ उडाली असून या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यासह जिल्हाधिकारी-जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे ०१ सप्टेंबर २०२० रोजी वयाच्या १०४ व्या वर्षी देवाज्ञा झाली. अहमदपूर तालुक्यातील भक्ती स्थळ इथे ०२ सप्टेंबर २०२० रोजी शासकीय इतमामात महाराजांचा अंत्यविधी करण्यात आला होता. त्यानंतर त्या ठिकाणी महाराजांची विधिवत समाधी बांधण्यात आली. मात्र ०८ नोव्हेंबर २०२२ रोजी समाधी स्थळाची विटंबना करून महाराजांच्या अस्थी, अस्थी ठेवलेली तीन बाय तीन आकाराची अष्ट धातूची पेटी, तसेच बांधलेली समाधी नष्ट करून त्यावरील महादेवाची पिंड सुद्धा पळवून नेल्याचा गंभीर आरोप भक्तीस्थळ विश्वस्त मंडळाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलाय. तसेच या गंभीर प्रकरणाची तक्रार देशाचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री-गृहमंत्री, लातूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदपूरचे तहसीलदार तसेच अहमदपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या समाधी स्थळाची विटंबना करण्याचा घाट काही जण घालत असल्याची ०५ सप्टेंबर २०२२ रोजी विश्वस्त मंडळाने एका निवेदनाद्वारे लातूरचे जिल्हाधिकारी-जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आता समाधी उकरून समाधी स्थळाचे पावित्र्य भंग करणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच अस्थी ठेवलेली अष्ट धातूंची पेटी, त्यातील सर्व अस्थी, महादेवाची पिंड परत मिळवून भक्ती स्थळाला तसेच आम्हा विश्वस्त मंडळाला संरक्षण देण्याची मागणी विश्वस्त मंडळाने निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर माधवराव अण्णाराव बरगे, सुभाष वैजनाथ सराफ, बब्रुवान देवराव हैबतपुरे, व्यंकटराव गंगाधरराव मद्दे, शिवशंकर बळीराम मोरगे, संदीप लक्ष्मणअप्पा डाकुलगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात पार पडल्यानंतरही अशा पद्धतीने समाधीची विटंबना होऊन अस्थी पळवून नेल्यामुळे भक्तांमध्ये मोठा आक्रोश आहे. तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशसहित देशभरातील भाविकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तात्काळ छडा लावण्याची मागणीही होऊ लागली आहे.

About The Author