दयानंद कला महाविद्यालयात बाल दिवस उत्साहात साजरा
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयामध्ये दि. 14 नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून बाल दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. शिवाजी जवळगेकर, डॉ. प्रदीप सूर्यवंशी, डॉ. सुनील साळुंके, डॉ. प्रशांत दीक्षित, डॉ. दयानंद शिरुरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा.विलास कोमटवाड यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कार्यावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोरच्या 1930 च्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला होता. पंतप्रधान पदाच्या कालखंडामध्ये साम्यवादी विचाराच्या रशिया सोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून देशामध्ये औद्योगिक तांत्रिक विकासाची वाटचाल चालू ठेवून नुकत्याच स्वातंत्र्य झालेल्या देशाला स्थैर्य मिळवून दिले. तसेच भाषावार प्रांत रचना, देशाच्या शेती समोरील आव्हाने, सैन्य ताकद वाढवणे, आणि जगामध्ये देशाचे वेगळे अस्तित्व निर्माण करणे ही आव्हाने त्यांनी अतिशय यशस्वीपणे पेललेली दिसून येतात. जगामध्ये अलिप्ततावादी धोरण स्वीकारून पहिल्या दोन महायुद्धामध्ये निर्माण झालेल्या कोणत्याही गटामध्ये सामील न होता देशाचा विकास हा प्राधान्यक्रम ठरवून त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वेगळी अशी देशाची ओळख निर्माण केली. पंडीत जवाहरलाल नेहरु यांना लहान मुलांबद्दल अति प्रेम स्नेह होते त्यांना लहान मुलं चाचा नेहरू म्हणून ओळखत असत म्हणून त्यांचा जन्मदिवस देशभरामध्ये बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. महाविद्यालयामध्ये आज प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड आणि उपप्राचार्य प्रशांत मान्नीकर यांनी पंडित नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.