प्रल्हादबुवा रामदासी यांना श्री समर्थ रामदास स्वामीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
उदगीर (वार्ताहर ) : राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी संस्थानचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार समर्थ भक्त श्री प्रल्हादबुवा रामदासी (करखेलीकर) यांना श्री क्षेत्र सज्जनगड येथे महर्षी पाणिनी संस्कृत एवं वैदिक विश्वविद्यालयाचे “कुलगुरू प्रो.विजयकुमार मेनन” उज्जैन , यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार समर्थ कार्य करणाऱ्या समर्थ भक्तास दरवर्षी संस्थान तर्फे दिला जातो. राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी संस्थानचा वतीने दरवर्षी राष्ट्रीय पातळीवरचा हा सन्मान दिला जातो.
प्रल्हादबुवा रामदासी यांनी उदगीर येथे श्री समर्थ रामदास स्वामी मंदिराची स्थापना केली असून या माध्यमातून त्यांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रामदास स्वामींच्या कार्यप्रसारासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले असून, दरवर्षी ते उदगीर येथे वार्षिक उत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित करतात.
पुरस्कार देताना व्यासपीठावर रामदास स्वामी संस्थान सज्जनगड चे अध्यक्ष दुर्गाप्रसाद स्वामी ,विश्वस्त सू. ग. तथा बाळासाहेब स्वामी, डॉ. निमकर, सौ. जोशनाताई कोल्हटकर या उपस्थित होत्या. पुरस्कार सोहळ्यास संपूर्ण भारतभरातून ११०० मठाचे मठपती तसेच समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह , गौरव पत्र व 21000 चा धनादेश असे आहे. प्रल्हादबुवा रामदासी यांना मिळालेल्या सन्मानाने अभिनंदन करण्यात येत आहे.