सीमावर्ती भागातील श्रीक्षेत्र होळसमुद्र येथे हरिनाथ बाबांची यात्रा उत्साहात संपन्न

सीमावर्ती भागातील श्रीक्षेत्र होळसमुद्र येथे हरिनाथ बाबांची यात्रा उत्साहात संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : जगातील एकमेवाद्वितीय असलेल्या सद्गुरु हरीनाथ बाबांच्या संजीवन समाधीची कार्तिकी यात्रा मोठ्या आनंदोत्सवात व लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत अनेक धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न झाली. धार्मिक व सामाजिक एकात्मतेचे प्रतीक असलेल्या व चार राज्यांच्या सीमेवर असलेल्या सद्गुरु हरीनाथ महाराज यात्रा महोत्सव होळसमुद्र येथील यात्रेनिमित्त अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेची सुरुवात एकादशीच्या नगर प्रदक्षिणेने झाली. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ह.भ.प.भागवताचार्य अंजलीताई केंद्रे यांचे हरिकीर्तन, यात्रे दिवशी पहाटेपासून बाई लेकीच्या सद्गुरु हरीनाथ बाबांच्या संजीवन समाधीला लक्ष्य प्रदक्षिणा व समाधीवरील सुवर्ण परिसास पंचामृत अभिषेक तर दिवसभर महापूजा, दुपारी गोंधळाचा कार्यक्रम, सायंकाळी सामुहिक महाआरती, रात्री ह.भ.प.एकनाथ महाराज हांडे यांचे कीर्तन, त्यानंतर हरी जागर, पहाटे गौळणीचा सुमधूर कार्यक्रम, यानंतर नाथांच्या पालखीला सुंदर सजवून सकाळी नाथ दरबारातून वारकऱ्यांच्या आनंद उत्साहात, टाळ ,वीणा, मृदंग आणि हरिनाथाच्या नाम घोषणाच्या गजरात ,नाचत, वाजत, गाजत पालखी गावाच्या वेशीतील राम मंदिराच्या समोर आली. या ठिकाणी तब्बल सहा तासापेक्षा जास्त वेळ जंगी भारुडाचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बालाजी ढगे, अनंत कदम व माधव शिंदे यांच्या पुढाकाराने गावातून पहिली C.A., पहिले IIT, IT, बनत असलेले, वैद्यकीय आणि नव तंत्रज्ञान क्षेत्रात नावलौकिक मिळवित असलेल्या तब्बल 40 गुणवंतांचा व चौदा खडीचे पहिले ॲप बनवणारे शिक्षक नारायण शिंदे यांचा सुप्रसिध्द साहित्यिक माधव कदम व शिक्षण तज्ञ स्वरूप चांदुर्गे कदम यांच्या हस्ते शाल, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या यात्रेनिमित्त सद्गुरु हरीनाथ बाबांच्या संजीवन समाधीला फुलांनी सुंदर सजावट संजय तपशाळे, देवणी या भक्ता कडून करण्यात आली होती. पालखीची सजावट विजयकुमार पांडुरंग येरोळे यांनी केली होती. गोंधळा दिवशी राजकुमार पांचावरे तोरणा,पौर्णिमे दिवशी नाथ कदम यांच्या बाई लेकी, काल्यादिवशी अमोल नानासाहेब कदम परभणी होळसमुद्रकर यांनी अन्नदान केले. गोंधळाचे यजमान विठ्ठलराव धोंडीबा बिरादार हे होते. यात्रेकरूंसाठी मोफत मसाला दुधाची व्यवस्था मल्लिकार्जुन वैजनाथ माशीमाडे यांच्या वतीने करण्यात आलेली होती. भारुडाच्या वेळेस सर्व यात्रेकरूसाठी अल्पोपहाराची व्यवस्था मोहन व्यंकटराव बिरादार, संतोष माधवराव येनके, विजयकुमार हनुमंतराव शिंदे, रामेश्वर विजयकुमार येनके, राम संतराम कदम (पाटील) यांनी स्वयंस्फूर्तपणे केली होती. गावातील काही नवतरुणींकडून संपूर्ण रस्ते सडा घालून रंगीबेरंगी सुंदर रांगोळ्याने सजवण्यात आलेली होती. याशिवाय यात्रेमध्ये गावातील अनेक तरुण, कार्यकर्ते, नेते, संस्था, पदाधिकारी यांच्या वतीने बॅनर लावून यात्रेची शोभा वाढवण्यात आलेली होती.

या यात्रेनिमित्त भाविक भक्ता बरोबरच अनेक राजकीय नेते-पुढारी यांनी नाथ दरबारात येवून नाथांचे दर्शन घेतले. लाखो भक्तांनी गजबजलेल्या या यात्रेत दोनशे पेक्षा जास्त लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची दुकाने थाटली होती. यातच कर्नाटकाचे पशुपालक मंत्री,या भागाचे आ. प्रभू चव्हाण यांनी भजनातील वारकर्‍यांसोबत केलेल्या नृत्याने तर लाखो भाविकांनी गजबजलेल्या गच्च गर्दीत वेगळीच ऊर्जा भरली. यात्रेच्या यशस्वीततेसाठी संस्थानचे पुजारी प्रविण महाराज, सर्व पदाधिकारी, सर्व भजनी मंडळ, गावातील पुढारी, मान्यवर, तरुण मंडळी व इतर सर्वानीच योगदान दिले.

About The Author