27 लाख 80 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

27 लाख 80 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्याला नूतन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे लाभल्यापासून पोलीस प्रशासनाला गतिमानता आली आहे. विशेषतः अवैध धंद्याच्या विरोधामध्ये पोलीस प्रशासन अत्यंत सक्रिय झाले आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम हे सुरुवातीपासूनच सक्रिय आहेत. मात्र आता त्यांच्या सक्रियतेला जोड आणि प्रोत्साहन मिळाल्यामुळे त्यांनी योग्य पद्धतीचे नियोजन करून अवैध गुटखा, मटका, जुगार याच्या विरोधात वेगवेगळ्या पथकांची निर्मिती करून गुन्हेगारांना पळता भुई थोडी केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

27 लाख 80 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम , उपविभागीय पोलिस अधिकारी, चाकूर व अहमदपूर यांनी उपविभागीय चाकूर,अहमदपूर पोलीस ठाणे चाकूर आणि अहमदपूर तसेच लातूर येथील दंगल नियंत्रण पथकातील पोलीस अंमलदार अशा एकूण 25 पोलीस अधिकारी व अंमलदारांचे वेगवेगळी पथके तयार करून अहमदपूर पोलीस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.

त्याप्रमाणे उपविभाग अहमदपूर हद्दीमधील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याकरिता अवैध धंद्याची माहिती काढत असताना पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की,अहमदपूर शहर व परिसरातील काही इसम प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची चोरटी विक्री व्यवसाय करीत आहेत, साठवणूक करीत आहेत.

अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहनिशा करून सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वात पोलिस अधिकारी व अमलदारांच्या पथकांनी एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून 6 इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे कडून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे,महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटका व सुगंधित पानमसाला असा एकूण 27 लाख 80 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखू जप्त करण्यात आले आहे.

सहाय्यक आयुक्त कार्यालय, लातूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे अहमदपूर येथे प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारे इसम नामे परवेज इस्माईल शेख, (वय 36 वर्ष, राहणार काळेगाव रोड , अहमदपूर), अयाज इस्माईल शेख, (राहणार कमला नेहरू शाळेच्या बाजूला, अहमदपूर), गौस तांबोळी,(राहणार अंबाजोगाई रोड, अहमदपूर.),इब्राहिम तांबोळी,(राहणार अंबाजोगाई रोड, अहमदपूर.), निसार बीस्ता (सर्व राहणार अंबाजोगाई रोड, अहमदपूर.), बाळू मुंडे, (राहणार भाग्यनगर अहमदपूर), राजू हामने, (राहणार भाग्यनगर अहमदपूर),
जावेद शेख,(राहणार भाग्यनगर अहमदपूर), आसद तांबोळी,( राहणार अहमदपूर), सय्यद इब्राहिम, (राहणार अहमदपूर),इसाक शेख , (राहणार अहमदपूर यांचे विरुद्ध पोलीस ठाणे अहमदपूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 533/ 2022, कलम 328,188, 272, 273 भा.द.वि. तसेच अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम-59,गुन्हा रजिस्टर क्रमांक 534/ 2022, कलम 328,188, 272, 273 भा.द.वि. तसेच अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम-59.,गुन्हा रजिस्टर क्रमांक 535/ 2022, कलम 328,188, 272, 273 भा.द.वि. तसेच अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम-59, गुन्हा रजिस्टर क्रमांक 536/ 2022, कलम 328,188, 272, 273 भा.द.वि. तसेच अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम-59, याप्रमाणे 04 गुन्हे दाखल करून 27 लाख 80 हजार 485 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमूद आरोपी पैकी 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून इतर 5 आरोपी फरार आहेत.त्यांचा शोध घेण्यात येत आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात, सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम,यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दूरपडे, पोलीस उपनिरीक्षक रोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय चाकूर,अहमदपूर तसेच पोलीस ठाणे चाकूर,अहमदपूर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच लातूर येथील दंगल नियंत्रण पथकातील जवानांनी पार पाडली.

About The Author