राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा नवा मार्ग आहे – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : इंग्रजांनी तयार केलेल्या शैक्षणिक धोरणानुसार आपण आजपर्यंत शिक्षण घेत आलो, परंतु जागतिकीकरणाच्या या युगात जगाशी स्पर्धा करण्यासाठी आणि भारताला महासत्तेकडे घेऊन जाण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे विद्यार्थ्यांच्या विकासाचा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. असे, स्पष्ट प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाच्या नॅक तथा आय. क्यू. ए.सी. विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण२०२० च्या अनुषंगाने ‘अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ‘ या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते तर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून नॅक समन्वयक तथा उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी, आय. क्यू.ए.सी. समन्वयक तथा इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. अतिश आकडे, भूगोल विभागाचे डॉ. सचिन गर्जे आदी विचार मंचावर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाच्या आहे, या युगात तंत्रज्ञानाचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट चे अकाउंट काढून शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या बदलाचे स्वागत करावे. असे आवाहन ही त्यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांना अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका यांच्यावतीने डि.लीट. ही पदवी सन्मानपूर्वक बद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी यांच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कौमी एकता दिवस ही साजरा करण्यात आला व हिंदी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘प्रयास ‘ या भीतीपत्रकाचे प्रकाशन ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ई -मेल अकाउंट कसे काढायचे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन डॉ. सचिन गर्जे यांनी केले तर, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट या अकाउंट संबंधी मार्गदर्शन प्रा. अतिश आकडे यांनी केले. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संबंधी सविस्तर मार्गदर्शन उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख बाबुराव मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन मराठी विभागाचे डॉ.मारोती कसाब यांनी केले व आभार हिंदी विभागाचे प्राध्यापक तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमधिकारी डॉ पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.