घरफोडीतील आरोपींकडून, चोरीस गेलेली रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने तसेच चोरलेले 14 मोबाईल असा एकूण 1 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
लातूर (एल. पी.उगीले) : लातूर जिल्ह्यामध्ये घरफोड्या आणि चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारावर वचक बसवण्याच्या कामी लातूर पोलिसांना यश आले असून, घरपोडीतील आरोपीला अटक करून चोरीला गेलेल्या रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने तसेच इतर ठिकाणी केलेल्या चोऱ्यातून 14 मोबाईल लातूर पोलिसांनी जप्त केले आहेत.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 21 ऑक्टोंबर ते 22 ऑक्टोंबर चे मध्यरात्री पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीतील पद्मानगर येथील एका घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून कपाटात ठेवलेली सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम 69 हजार 500 रुपये चा मुद्देमाल चोरून नेले.अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन एमआयडीसी येथे गुरनं 593/2022 कलम 457,380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी निर्देशित करून महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे,उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस पथक नेमुन तपासा बाबत सूचना देण्यात आले होते,तपासा दरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरून मोठ्या शिताफीने आरोपी नामे अक्षय प्रभाकर कणसे,( वय 21 वर्ष, राहणार प्रकाश नगर, लातूर),याला ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्या बाबत विचारपूस केले असता, त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुल केले. गुन्ह्यात चोरलेल्या मुद्देमाल पैकी 30 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले.
तसेच नमूद आरोपीकडे आणखीन विचारपूस केली असता त्याने लातूर शहरातील विविध ठिकाणांहून चोरी केलेले अंदाजे 1 लाख 59 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 14 मोबाईल चोरल्याचे कबूल केले. त्यावरून सदरचे मोबाईल जप्त करण्यात आले असून मोबाईल मालकांचा शोध पोलीस घेत आहेत. नमूद गुन्ह्यात एकूण 1 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वातील टीम मधील पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड, सहाय्यक फौजदार भागवत मुळे , भीमराव बेल्लाळे, संजय फुलारी, अर्जुन राजपूत, मुन्ना मदने , माधव आंबेकर, विनोद कातडे, मदार बोपले, निलेश जाधव यांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणून, गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी बजावली आहे.