लातूर ग्रंथोत्सव-2022’चा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा – सूर्यकांत शिरसे

लातूर ग्रंथोत्सव-2022’चा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा - सूर्यकांत शिरसे

लातूर (एल.पी.उगीले) : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय यांच्यावतीने नगर भवन (टाऊन हॉल) येथे सोमवारपासून दोन दिवसीय ‘लातूर ग्रंथोत्सव 2022’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी अकरा वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्धन वाघमारे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमाचा ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी तसेच वाचकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रंथ मित्र सूर्यकांत शिरसे यांनी केले आहे.

खा. सुधाकर शृंगारे, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. रमेश कराड, आ. अमित देशमुख, आ. संभाजी पाटील-निलंगेकर, आ. बाबासाहेब पाटील, आ. संजय बनसोडे, आ. धीरज देशमुख, आ. अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., ग्रंथालय संचालक द. आ. क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, ग्रंथालय सहायक संचालक सुनील हुसे, जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हावगीराव बेरकिळे यावेळी उपस्थित राहनार आहेत. दुपारी 2 वाजता ‘विद्यार्थी वाचक संवाद’ आयोजित करण्यात आला असून याचे संयोजन अनिता यलमट्टे करतील. तिसऱ्या सत्रात दुपारी 3 वाजता कादंबरीकार, ज्येष्ठ साहित्यिक आणि 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शेषराव मोहिते यांची प्रकट मुलाखत होईल. समीक्षक डॉ. जयद्रथ जाधव आणि डॉ. ज्ञानदेव राऊत ही मुलाखत घेणार आहेत. चौथ्या सत्रामध्ये दुपारी चार वाजता कवी संमलेन होणार असून प्रसिद्धी कवयित्री शैलजा कारंडे-नागिमे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील.

ग्रंथोत्सावाच्या दुसऱ्या दिवशी, 22 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम’ या विषयावरील परिसंवाद होणार आहे. इतिहास संशोधक तथा विचारवंत डॉ. सोमनाथ रोडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात प्रा. भूषणकुमार जोरगुलवार, प्रा. डॉ. सदाशिव दंदे, प्रा. डॉ. सतीश यादव, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सहशिक्षक भाऊसाहेब उमाटे आपले विचार मांडतील.

दुपारी अडीच वाजता ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी साहित्य व वाचक’ या विषयावरील परिसंवाद होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, कथाकार डॉ. सुरेंद्र पाटील, प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, डॉ. सुनिता सांगोले, कवयित्री अरुणा दिवेगावकर उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडेचार वाजता उत्कृष्ट वाचकांचा सत्कार व ग्रंथोत्सवाचा समारोप अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, डॉ. जयद्रथ जाधव उपस्थित राहतील.

ग्रंथोत्सवातील ग्रंथप्रदर्शन व विक्री दोन्ही दिवस सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत सुरु राहील. जास्तीत जास्त वाचक, साहित्यप्रेमी नागरिकांनी या ग्रंथोत्सवास उपस्थित राहावे, असे आवाहन श्यामलाल वाचनालयाचे सचिव तथा ग्रंथ मित्र ग्रंथालय चळवळीतील ज्येष्ठ नेते सूर्यकांत शिरसे यांनी केले आहे.

About The Author