सर्व समाजातील लोकांना एकत्र आणणारा मस्जिद परिचय कार्यक्रम उदगीर शहरातील पनचक्की मस्जिदीत संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : शहरातील मध्यवर्ती भागात भाजी मार्केट जवळ स्थित पनचक्की मस्जिद येथे मस्जिद कमिटीच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शेख असगर यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली. विश्वातील सर्व मानव आपापसात बंधू आहेत, आपण प्रेम बंधुभाव, आपुलकी जोपासण्याचा प्रयत्न करावा. त्याचाच भाग मस्जिद परिचय असल्याचे त्यांनी सांगितले.
साऱ्या मशिदीचा परिचय मोमीन अब्दुल मुजीब यांनी करून दिला. मस्जिद हा शब्द सजदा या शब्दापासून बनलेला आहे. सजदा याला मराठीत साष्टांग नमस्कार म्हणतात, ज्या ठिकाणी सामूहिकरीत्या साष्टांग नमस्कार केला जातो (सजदा) त्या जागेला मस्जिद असे म्हणतात. त्यांनी अजान बद्दल सांगताना स्पष्ट केले की, अजान म्हणजे लोकांना नमाज पठण करण्यासाठी मस्जिदित बोलावण्यासाठी दिली जाणारी हाक किंवा आरोळी आहे. अजान मध्ये दिल्या जाणाऱ्या साऱ्या शब्दांचा अर्थ त्यांनी समजावून सांगितला. अजानची आवाज ऐकून लोक मस्जिदीत येतात. नमाज पठण करण्यासाठी शरीर, कपडे व ज्या ठिकाणी नमाज पठण केली जाते ती जागा स्वच्छ असणे अनिवार्य आहे. नमाज पठण करण्यापूर्वी वजू केले जाते म्हणजेच शरीराचे खुले अवयव धुतले जातात. याचे प्रात्यक्षिक शेख़ इस्माईल यांनी करून दाखवले. वुजू नंतर पनचक्की मस्जिदीचे इमाम मौलाना क़ुरेशी सज्जाद यांनी सामूहिक नमाज पठणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
नमाज अल्लाहशी जवळीकता प्राप्त करण्याचा मार्ग आहे. नमाज मानवाला दुष्कर्म व अश्लीलते पासून दूर ठेवते. नमाज प्रत्येक श्रद्धावंताकरिता दिवसातून पाच वेळा पठण करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
नमाजच्या प्रात्यक्षिकांनंतर मस्जिदीच्या अंतरंगाबद्दल माहिती देण्यात आली.मस्जिद मध्ये असणाऱ्या विविध भाग जसे मेहराब,मिंबर इत्यादी बाबींचा परिचय देण्यात आला. उपस्थित असणाऱ्या बांधवांनी आपल्या मनातील शंका व प्रश्न विचारून विविध प्रकारची माहिती घेण्याचा प्रयत्न केला या सर्वांच्या प्रश्नांच्या शंकांचा समाधानकारक उत्तरे याप्रसंगी देण्यात आली. मस्जिद कमिटीतील सदस्यानी कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या बांधवांना शाल देऊन त्यांच्या सत्कार केला. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या बांधवांनीही अतिशय उत्तम अशी माहिती दिल्याबद्दल मोमीन मुजीब यांचा शाल देऊन सत्कार केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मस्जिद कमिटीतील सर्व सदस्यांनी आपले योगदान दिले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शेख असगर यांनी केले तर सूत्रसंचालन देवणीकर हक्कानी यांनी केले.अनिल बागबंदे,मनोहर कानमंदे,उमाकांत चनगे,बाबुराव माशाळकर,मुन्ना हसाळे, सागर सोलापूरे,अमित कंठे,मनोज बिब्राळे,हुडगे सावकार,ओमकार गांजुरे. जमात इस्लामी हिंदचे उदगीरचे सर्व सदस्य, परिसरातील सर्व मान्यवर व मस्जिद कमिटीचे अध्यक्ष शकील अहमद, उपाध्यक्ष अब्दुल करीम भाई, मोहम्मद इक्बाल, शेख खालीद इत्यादी सदस्य याप्रसंगी उपस्थित होते. पनचक्की मस्जिद कमिटीने ठेवलेल्या या उपक्रमाबद्दल शहरातून सर्वत्र कौतुक होत असून असे कार्यक्रम इतर मस्जिद कमिटीने घ्यायला हवेत, अशी चर्चा चालू आहे.