महात्मा फुले महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे थाटात उद्घाटन
अहमदपूर (गोविंद काळे) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत आंतर महाविद्यालयीन विद्यापीठ स्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे उद्घाटन येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या मैदानावर थाटात संपन्न झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर हे होते, तर स्पर्धेचे उद्घाटक म्हणून किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे सचिव ज्ञानदेव झोडगे गुरुजी हे उपस्थित होते.
तसेच उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सहसचिव माधवराव पाटील, विद्यमान संचालक पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, नागेश गिरी, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गणपतराव माने, श्रीरंगराव बंडापल्ले, माणिकराव रोहिले, पुंडलिकराव पाटील, अनिल गिरी तसेच महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. आर. काबरा, महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी.जी. मुसणे, यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी यावेळी आपल्या मनोगतात महाविद्यालयाच्या गुणवत्तेची व क्रीडा संस्कृतीची ओळख करून दिली. महात्मा फुले महाविद्यालयाने विद्यापीठात तलवारबाजी आणि रस्सीखेच या दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे, असेही ते म्हणाले. प्रारंभी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विश्वनंदा नंदवंशी व जुफिशा शेख यांनी विद्यापीठ गीत सादर केले.
स्पर्धेसाठी विद्यापीठाकडून आलेले पंच डॉ.चंद्रकला हणमंते, राहुल वाघमारे, किरण नागरे, विशाल गडंबे, अश्फाक सय्यद, संतोष कांबळे यांचे तसेच निवड समितीचे अध्यक्ष डॉ. अश्विन बोरीकर, प्राचार्य डॉ. बळीराम लाड, डॉ. वैशाली माडेकर, डॉ. मनोज पैंजणे तसेच संघ व्यवस्थापक डॉ. बालाजी जाधव यांचेही स्वागत महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांसमोर महात्मा फुले महाविद्यालय व यशवंत महाविद्यालय नांदेड यांच्यामध्ये शो मॅच झाली. या समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर आभार प्रदर्शन संयोजक क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अभिजीत मोरे यांनी केले. सदरील रस्सीखेच स्पर्धेमध्ये विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील मुलांचे सहा संघ व मुलींचे चार संघ सहभागी झाले आहेत.