देशी दारू व वाहनासह 1 लाख 27 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनची कामगिरी
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर परिसरात अवैध देशी दारू आणि हातभट्टी याचा बाजार वाढला होता. या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनंतर उदगीर ग्रामीण पोलिसांनी सक्रियपणे काम करत देशी दारू विक्रेते आणि देशी दारू अवैध मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून अशा पद्धतीच्या अवैध धंद्याला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, आगामी ग्रामपंचायत निवडणुकीचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध व बेकायदेशीरपणे दारू विकणारे यांचेवर कारवाई करण्या बाबत लातूर जिल्ह्यात मोहीम सुरु आहे, त्यास अनुसरून पोलीस ठाणे स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने उप विभागीय स्तरावर, उपविभागीय पोलीस अधिकारी, डॅनियल जॉन बेन यांचे मार्गदर्शना खाली व पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांचे नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुक अनुषंगाने विविध पथके तयार करण्यात आले होते. पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण हद्दीत विनापास परवाना देशीदारूची अवैध विक्री,व्यवसाय करण्यासाठी दैठणा शेत शिवारात साठवणुक केली आहे.अशी गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस ठाने उदगीर ग्रामीणचे पथकाने दैठणा येथे पुलाचे जवळ ऊसाच्या शेतात अचानक छापा मारला असता, तेथे देशी दारू टॅंगो कंपनीचे 20 बॉक्स किंमती-67200/- रूपयेची बेकायदेशररित्या देशी दारू आणि एक स्कूटी वाहन किं.60000/- रू. ची असा एकूण- 127200/- रुपयेचा मुदेमाल मिळून आला असून सदर प्रकरणी बाळासाहेब मारुती बिरादार ( राहणार दैठणा, तालुका- शिरूर अनंतपाळ) यांचे विरुद्ध पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुरनं 539/2022 कलम कलम 65(अ)(ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार पोहका रमेश कांबळे हे करत आहेत.
सदरची कारवाई पोलिस ठाणे उदगीर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ, पोलीस अंमलदार संतोष शिंदे, गेडाम, नामदेव चेवले यांनी केली आहे.