श्यामलाल हायस्कूल मध्ये कला अभिव्यक्ती उद्घाटन सोहळा संपन्न!
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा, विद्यार्थी प्रिय सांस्कृतिक, कला अभिव्यक्ती उद्घाटन सोहळा थाटामाटात संपन्न झाला.
सांस्कृतिक कला अभिव्यक्तीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य सर होते.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार रसूल पठाण सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक रसूल पठाण यांनी उद्घाटन प्रसंगी श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेच्या सर्व आस्थापना अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे विविध विद्यार्थी प्रिय, मनोरंजनातून आनंददायी शिक्षण देणाऱ्या उपक्रमाचे आयोजन केले जाते, उदगीर व परिसरात सांस्कृतिक अभिव्यक्ती व साहित्याची भूक भागवण्याचे काम ही संस्था अविरतपणे करत आहे याचा आमच्यासारख्या साहित्यप्रेमींना सार्थ अभिमान आहे, विद्यार्थ्यांना बालवयापासूनच विविध उपक्रमातून शिक्षण देण्याचे काम येथे केले जाते ही विशेष बाब आहे. असे मनोगत व्यक्त केले व उद्घाटन पर सर्वांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोपात ऍड. सुपोषपाणी आर्य सर यांनी सांस्कृतिक कला अभिव्यक्तीच्या निमित्ताने सर्व बाल कलाकारांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. कला, क्रीडा व विज्ञान हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात महत्वपूर्ण बाबी आहेत यांचा अनुभव प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना कार्यातून मिळावा यासाठी ही संस्था अशा विविध उपक्रमांचे आयोजन सदोदित करते त्यास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो, आनंद व मनोरंजनातून कला अभिव्यक्त करण्याचे काम सांस्कृतिक कार्यक्रमातून होत असते म्हणून दरवर्षी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये स्टेज करेज निर्माण करण्यासाठी असे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयोगी असतात. असे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर संस्था सचिव ऍड. विक्रमजी संकाये, संस्था सहसचिव अंजुमनीताई आर्य, माजी संस्था सचिव लहुजी भोसले, शालेय समिती सदस्य पंडितजी सुकनिकर, अंबेसंगे तसेच द्युमानवंशी आर्य, श्यामलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद चोबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील बागडे, संस्थांतर्गत सर्व आस्थापना प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन व सांस्कृतिक कला अभिव्यक्तीचे सादरीकरण याचे सूत्रसंचालन प्रविण भोळे, उमाकांत सूर्यवंशी, घोगरे संग्राम, विद्यार्थिनी रागिणी दहिफळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.