26 सरपंच पदासाठी 119 उमेदवारांचे अर्ज इतर इच्छुक सदस्यांचे 677 अर्ज
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील 26 महत्त्वाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मुदत संपल्यामुळे 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 26 सरपंच पदासाठी 119 जणांनी 119 अर्ज भरले आहेत. तर सदस्य पदासाठी 677 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. हे चित्र पाहिल्यास प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये प्रचंड चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक ग्रामपंचायत मधून दुरंगी, तिरंगी लढती पाहायला मिळतील. अशी शक्यता आहे.
काही राजकीय पुढारी अपक्ष सदस्यांना उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी गळ घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच प्रत्यक्ष पक्षाच्या नावावर किंवा चिन्हावर निवडणुका होत नसल्या तरीही, कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा गटाचा आहे? हे जग जाहीर असल्याने अनेक ठिकाणी आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवरील निवडणुका वरून पुढील निवडणुकांमध्ये होणारी स्थित्यंतरे चर्चिली जात असल्याने या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. असेही राजकीय जाणकार बोलत आहेत, असे असले तरीही उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल, असेही बोलले जात आहे. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
