अंबादास दानवे यांना विधान परिषदेवर संधी म्हणजे निष्ठा आणि समाजकार्याची पावती – स्वप्निल जाधव
उदगीर (प्रतिनिधी) महाविकास आघाडीच्या वतीने मराठवाड्याला न्याय देत शिवसेनेचे एकनिष्ठ आणि विकासाची जाण असलेले नेते अंबादास एकनाथराव दानवे यांना संधी दिली. ही मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत सौभाग्याची गोष्ट आहे. असे विचार शिवसेनेचे उदगीर विधानसभा प्रमुख स्वप्नील अण्णा जाधव यांनी व्यक्त केले आहेत.
राजकारणामध्ये इच्छुकांची खूप गर्दी असते. मात्र एकनिष्ठ राहिलेले नेते आणि विकासाची जाण आणि भान असलेल्या नेत्याला संधी मिळणे म्हणजे खऱ्या अर्थाने त्या परिसराचा विकास होण्याचा मार्ग मोकळा होणे होय.
राजकारणामध्ये सक्रियपणे सन 2000 पासून शिवसेनेचे औरंगाबाद महापालिकेतील सदस्य म्हणून अंबादास दानवे यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. तसेच 2011 मध्ये औरंगाबाद शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून समाजशास्त्र आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेतलेले असल्यामुळे, समाजाच्या प्रश्नाकडे पाहण्याचा त्यांचा विकसित दृष्टिकोन आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊनच त्यांना 2019 मध्ये शिवसेनेने औरंगाबाद, जालना जिल्हा स्थानिक प्राधिकरण मतदार संघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. आणि त्या संधीचे सोने करत त्यांनी विजयश्री खेचून आणली. विधान परिषदेमध्येही त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. त्यामुळेच शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम करण्याची त्यांना संधी दिली होती. त्या वेळेसही त्यांनी अत्यंत उल्लेखनीय कार्य केले आहे. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी जणू क्रांती घडवून आणली. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सरकारचे विशेष लक्ष वेधले. तसेच बोगस शिक्षक भरती प्रकरणी सुद्धा त्यांनी शासनाचे लक्ष वेधले, यासोबतच जिल्हा परिषदेमध्ये सर्वसामान्य नागरिकांची मुले शिकतात, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. त्यांना दिला जाणारा गणवेश हा दर्जेदारच असला पाहिजे. असा अट्टाहास धरून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देखील अंबादास दानवे यांनी खूप मोठे काम केले आहे.
महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून काम करत असताना त्यांनी आपल्या समाजशास्त्र आणि पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदवीचे ज्ञान दाखवून दिले आहे. त्यांच्या अशा विकासोन्मुख दृष्टिकोनाचा महाराष्ट्राला फायदाच झाला. शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या त्याग आणि निष्ठा वृत्ती याची दखल घेऊन त्यांना संधी दिली, ही गोष्ट मराठवाड्यासाठी खूप फायद्याची आहे. असेही युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
निश्चितपणे अंबादास दानवे यांच्या या निवडीमुळे मराठवाड्यातील शिवसेना पक्ष बांधणीला मदत होईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
