वाळू माफीयांची वाढत चालली दादागिरी!! कशी सहन करणार कर्तबगार अधिकारी?
उदगिर (एल. पी. उगीले) : सध्या वाळू माफीयांची मोठी दादागिरी सुरू झाली आहे. वाळूही बांधकामासाठी महत्त्वाचा घटक असल्याने, गरजू माणूस वाटेल त्या भावाने वाळू खरेदी करतो. घर बांधावे ही प्रत्येक माणसाची अपेक्षा असते. सर्वसामान्य माणसाचे स्वप्न असते, त्या स्वप्नपूर्तीसाठी तो धडपडत असतो. सामान्य माणसांची ही गरज तसेच मोठ्या बिल्डरची गरज विचारात घेऊन शासनाचा लाखो रुपयांचा गौण खनिजाचा टॅक्स बुडवून वाळू माफिया वाले वाळूचा साठा करणे, विनापरवाना वाळू उत्खनन करणे असे प्रकार सर्रास करत आहेत. मात्र या संदर्भात नूतन जिल्हा पोलीस प्रमुख सोमय मुंडे यांनी लक्ष घालून सर्व अधिकाऱ्यांना अवैध धंदे बंद करण्याच्या अनुषंगाने सूचना केल्या आहेत.
या सूचना विचारात घेऊन प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी सक्रिय झाले आहेत. वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये यापूर्वीही वाळू माफियाच्या विरोधात वेळोवेळी कारवाई करण्यात आलेली आहे. सोमठाणा नदीपात्रात उतरून साधारणतः रात्रीच्या वेळी कोणाचे लक्ष नाही, असे पाहून वाळू माफिया वाले जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रॉली, हायवा याच्या माध्यमातून वाळूचे उत्खनन करून साठेबाजी करत असतात. ही गोष्ट वाढवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांना चांगलीच माहीत होती. कारण त्यांनी यापूर्वीही अनेक कारवाया केल्या आहेत. त्याचप्रमाणे पुन्हा या विषयाकडे लक्ष देऊन गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवली, असता आरोपी बालाजी अशोक मंगनाळे (वय 35 वर्ष राहणार सुमठाणा), सलाउद्दीन शौकत आली (वय 22 वर्षे राहणार हटवाळ दयालसिंग टोटरी जिल्हा गाजीपुर उत्तर प्रदेश), अंतेश्वर माधव किवंडे (वय 34 वर्ष) शिवा माणिक कांबळे (वय 52 वर्ष), ज्ञानोबा विश्वनाथ तलवाडे (वय 35 वर्ष) सर्व राहणार सुमठाणा तालुका उदगीर हे दिनांक 6 डिसेंबर रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मौजे सोमठाणा नदीपात्रात पूर्व बाजूला पस्तीस किलोमीटरच्या जवळपास विनापरवाना वाळूचे उत्खनन करत असल्याची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक ईकराम बशीरसाब उजेडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरुडकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल सोनकांबळे आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून घटनास्थळावर धाड टाकली असता, त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी गौण खनिज उत्खननासाठी आणि चोरी करून वाळू घेऊन जाण्यासाठी, नदीपात्रात उतरून स्वतःच्या आर्थिक फायदा करून घेण्यासाठी शासनाचा महसूल बुडवून वाळूची चोरी करत असताना एक जेसीबी अंदाजे किंमत 16 लाख रुपये, तसेच आरोपीकडील सॅमसंग मोबाईल अंदाजे किंमत दहा हजार रुपये, एक ट्रॅक्टर हेड व ट्रॉली किंमत सात लाख पन्नास हजार रुपये तसेच चोरून काढलेली दोन ब्रास वाळू किंमत अंदाजे 9000 रुपये, लोखंडी मोठी चाळणी 13 हजार रुपये तसेच जेसीबी ऑपरेटर सलाउद्दीन यांच्याकडून ओपो कंपनीचा जुना वापरात असलेला मोबाईल किंमत नऊ हजार रुपये आणि जिओ कंपनीचा जुना वापरात असलेला मोबाईल किंमत एक हजार रुपये असा एकूण 23 लाख 92 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त करून कारवाई केली आहे.

या प्रकरणातील पाच आरोपी पैकी तीन आरोपींना घटनास्थळावरच अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच पळून गेलेल्या दोन आरोपींना सकाळी वाढवणा पोलिसांनी मोठ्या सीताफीने अटक करून त्यांच्या विरोधात गु.रं. न. 203/ 22 कलम 379 भारतीय दंड विधान संहिता याच्यासह गौण खनिज अधिनियम 1952 चे कलम 48 (7)(8) प्रमाणे फिर्यादी ईकराम बशीरसाब उजेडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून पुढील तपास वाढवणा पोलीस करत आहेत.
अनेक वेळा अशा पद्धतीचे गुन्हे करताना पकडले जाऊन देखील या चोरीच्या प्रकरणांमध्ये भरपूर पैसा मिळतो. या लालसे पोटी वाळू माफीयांची दादागिरी चांगलीच वाढलेली आहे. मात्र जर कर्तबगार अधिकारी असतील तर ती दादागिरी कशी मोडीत काढायची? याचे उदाहरण म्हणून वाढवणा पोलिसांच्या कारवाईकडे पाहता येऊ शकेल. वाढवणा पोलिसांनी केलेल्या या उत्कृष्ट तपासाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
