वृक्षारोपण आणि संवर्धन हा शाश्वत विकास होय – आ.विक्रम काळे
उदगीर (एल. पी. उगीले) : पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न माणसाने सतत केला पाहिजे. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यास केवळ पर्जन्यमानच नव्हे तर, विविध आजारालाही सजीव सृष्टीला सामोरे जावे लागते. याचे भान आणि जाण मानवाने ठेवावे. वृक्षारोपण आणि संवर्धन केल्याने हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राहते, वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतात. ऑक्सीजन चे महत्व कोरोना काळात आपण अनुभवले आहे. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाला चालना दिली जावी असे आवाहन औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले.
ते उदगीर येथील निदा उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव शेख मुस्ताक अब्दुल खादर, रामराव जाधव, यशवंत बिरादार, केंद्रप्रमुख सौ. प्रतिभा मुळे, चंदर अण्णा वैजापूरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, श्री मडके गुरुजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जानीमिया मो. हनीफसाब व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार विक्रम काळे यांनी भावी पिढी यशस्वी व्हावी. तसेच सर्व विद्यार्थी हे गुणवंत आणि यशवंत व्हावेत. त्यासाठी शिक्षक बंधूंनी प्रयत्न करावेत. उद्याचा देश म्हणजेच विद्यार्थी आहेत, या दृष्टीने काळजी घेऊन विद्यादान करावे. असे आवाहन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा चंदर अण्णा वैजापूरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनीही समायोजित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तफजुल अत्तार यांनी केले. या समारंभासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
