डॉ.हेलन केलर यांचं जीवन चरित्र दुर्दम्य इच्छाशक्तीची प्रचिती – राजेंद्र चव्हाण
उदगीर (एल.पी.उगीले) : सुंदरपणा हा डोळ्यांना नाही तर हृदयाला जाणवणारा असतो. सौंदर्य हे पाहणार्याला काळोखात आणि शांततेत देखील दिसतो. निराशा हेच माणसाचं सर्वात मोठं व्यंग आहे.असा जगाला संदेश देणाऱ्या हेलन केलर यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शून्यातून विराट विश्व निर्माण करून दाखवले. आपण जगण्यावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. कधीही हार न मानणे हा पहिला नियम, व पहिला नियम न विसरणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे. असे सांगणार्या डॉ.हेलन केलर यांचं जीवन चरित्र दुर्दम्य इच्छाशक्तीची प्रचिती देणार आहे. असे मत राजेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
शासकीय दूधडेअरी सभागृह उदगीर येथे चला कवितेच्या बनात अंतर्गत अर्जुनराव सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या २७८ व्या दिव्यांग दिन विशेष वाचक संवाद मध्ये प्रसिद्ध दिव्यांग व्याख्याते राजेंद्र बाजीराव चव्हाण, उस्मानाबाद.यांनी हेलन केलर जीवन चरित्र या साहित्यकृती वर संवाद साधताना ते पुढे म्हणाले की, जगातल्या पहिल्या दिव्यांग पदवीधर ज्यांना पाच भाषा येत होत्या. अशा डॉ. हेलन केलर यांची 12 पुस्तके प्रकाशित असून त्यांच्यावर ब्लॅक नावाचा एक चित्रपट देखील प्रसिद्ध आहे. त्यांनी हजारो व्याख्याने दिली. त्या दिव्यांग असल्या तरी त्यांची आवड पोहणे, घोडेस्वारी करणे व नेत्रहीनांचे कल्याण करणे, हे त्यांचे ध्येय होते. अनी सॅलीनीस नावाच्या शिक्षिकेने त्यांना अत्यंत कष्टाने शिकविले.मागच्या हजार वर्षात फक्त दोनच व्यक्ती होऊन गेल्या त्यापैकी एक डॉ. हेलन केलर आणि दुसरे नेपोलियन बोनापार्ट, मला सर्व काही करता येत नसले तरी मला काहीतरी करता येतं,ही त्यांची धारणा होती. जरी असेल काही आमच्या मध्ये व्यंग, परिस्थितीशी झटून होऊ अभंग. आम्ही अपंग नव्हे, आव्हानित आहोत. आमच्यासाठी वातावरण आणि दृष्टीकोनात्मक समस्या सर्वात महत्त्वाची आहे. असे त्या म्हणायच्या.
यावेळी झालेल्या चर्चेत अनेकांनी सहभाग घेतला. संभाजी या दिव्यांग तरूणाने हृदयस्पर्शी स्वागत गीत सादर केले. संवादकांचा परिचय ज्योती डोळे यांनी करून दिला. शेवटी अध्यक्षीय भाषणात अर्जुनराव सोमवंशी म्हणाले की, प्रतिकूलतेत देखील शून्यापासून विराट विश्व निर्माण करता येते. त्यासाठी सर्वप्रथम जगण्यावर प्रेम करावे लागेल.आज दिव्यांग दिन विशेष वाचक संवाद घेऊन अनंत कदम यांनी खूप मोठा संदेश दिला आहे. अश्या चळवळींना सर्वानीच बळ देण्याची गरज आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिझर्व्ह बॅंकेचे सेवानिवृत्त अधिकारी मुरलीधर जाधव यांनी केले तर आभार विशेष तज्ञ (समावेशित शिक्षण) आनंद बिरादार यांनी मानले.
