खेडेगावात जुगाराचे अड्डे थाटले!! तरीही वाढवणा पोलिसांनी त्यांना गाठले!!
उदगीर (एल. पी. उगिले) : वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही व्यक्तींनी जुगार खेळण्यासाठी मोठ्या चिंचेच्या झाडाखाली अड्डा थाटला होता. मात्र त्याचाही पत्ता वाढवणा पोलिसांच्या गुप्त बातमीदारांना लागलाच! त्यांनी वाढवण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांना या संदर्भात कल्पना देताच, वाढवणा पोलीस स्टेशनचे विशेष पथक अर्थात नळगीर दूरक्षेत्र हद्दीमध्ये तिरट नावाचा जुगार आपल्या फायद्यासाठी खेळला व खेळवला जात असताना पोलीस उपनिरीक्षक गायकवाड व विशेष पथकांनी धाड टाकून जुगारींना ताब्यात घेतले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच काहींनी पळ काढला.
नळगीर येथील महादेव मंदिराच्या पाठीमागे साडेपाच वाजण्याच्या सुमारास नऊ जण तिरट नावाचा जुगार पैसे लावून खेळत असताना पोलिसांनी धाड टाकून रंगेहात पकडले. या धाडीत दोन लक्ष 27 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल व जुगार खेळण्याचे साहित्य पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने जप्त केले.
नऊ आरोपी पैकी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मात्र चार आरोपी तुरीच्या पिकाचा आडोसा घेऊन घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. या संदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, जुगार खेळणारे दयानंद काशिनाथ बंडे (वय 53 वर्ष), अश्फाक चांदसाब शेख (वय 32 वर्ष), रियाज नबी साब तांबोळी (वय चोवीस वर्ष), मुजफ्फर अब्बास मोमीन (वय 38 वर्ष) तसेच चंद्रपाल पवार, विठ्ठल कापसे, विशाल नादरगे, आली मोमीन (सर्व राहणार नळगीर तालुका उदगीर) यांच्या विरुद्ध पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांच्या फिर्यादीवरून वाढवणा पोलीस स्टेशन येथे गु. र. नंबर 207/ 22 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल नागरगोजे हे अधिक तपास करत आहेत. विशेषत: पत्त्याच्या जुगाराच्या संदर्भात वाढवणा पोलिसांनी घेतलेली ही भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे, असे जनतेतून बोलले जात आहे.
