बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीची त्रैवार्षिक आढावा बैठक संपन्न
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील मौजे लोहारा येथील बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंपनीची दुसरी त्रैवार्षिक आढावा बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. भारत सरकारच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपनी तयार करण्याच्या उपक्रमातून नाबार्ड प्रस्थापित व अफार्म मार्गदर्शित यांच्या माध्यमातून बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंपनी लोहारा येथे स्थापन करण्यात आली आहे.
कंपनी स्थापनेपासून कंपनीची उद्दिष्ट पुर्ती आणि कंपनीने केलेले विविध कार्य या संदर्भामध्ये या आढावा बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीसाठी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रमोद पाटील, अफार्मचे विभागीय संचालक राजेंद्र इंगळे, यशवंत गायकवाड, तालुका कृषी कार्यालयाचे मंडळ अधिकारी देवनाळे, कृषी सहाय्यक हणमंतराव म्हेत्रे, आत्मा विभागीय व्यवस्थापक नितीन दुरुगकर, सहाय्यक संदीप अंधारे, बेनिनाथ कंपनीचे अध्यक्ष हंसराज मोमले यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि शेतकरी सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या स्वागताने करण्यात आली. कृषी मालाच्या प्रक्रियेच्या संदर्भात आणि कंपनीच्या ध्येय धोरणाच्या संदर्भात कृषी सहाय्यक हनुमंतराव म्हेत्रे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शेतीमध्ये मशागत, बियाणांची निवड, पेरणी, पिकांचे संरक्षण, पीक काढणी व मळणीतील कामे या अनुषंगाने शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी या संदर्भामध्ये सविस्तर असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना देवनाळे म्हणाले की, सर्व शेतकऱ्यांनी शासनाच्या वतीने कृषी खात्याच्या विविध योजनांचा फायदा घ्यावा. तसेच शेतीमालाच्या उत्पादनाच्या संदर्भातही माहिती सांगितली. आत्म विभागाचे व्यवस्थापक दुरुगकर यांनी शासनाच्या विविध योजना या सोबतच बियाण्यांच्या संदर्भात काळजी घेऊन बियाणे दर्जेदार घरीच निर्माण करावेत, विशेषतः सोयाबीन, हरभरा कंपनीचे बियाणे काळजीपूर्वक घरीच तयार करावेत, असे सांगितले.
नाबार्डचे प्रमोद पाटील यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शेतकऱ्याचा विकास घडवून आणण्यासाठी नाबार्डच्या वतीने अशा कंपनींना सहकार्य केले जाते. याचा लाभ कंपनीला व शेतकऱ्यांना होत असतो, तो त्यांनी करून घेतला पाहिजे असे सांगितले.
अफार्मचे इंगळे यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कंपनीचे सदस्य होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच कंपनीकडून शेतकऱ्यांना योग्य दरामध्ये निविदा पुरवठा, औषधे इत्यादी सेवा देणार आहेत. यासोबतच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला सोयाबीन, हरभरा असा माल कंपनीला विक्री करावा, म्हणजे योग्य भाव उपलब्ध होऊ शकेल, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक या कंपनीचे संचालक पद्माकर मोगले यांनी केले, तर आभार प्रदर्शन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश शिंदे यांनी मानले.
सदरील आढावा बैठक यशस्वी होण्यासाठी कंपनीचे अध्यक्ष हंसराज मोमले, अफॉर्मचे यशवंतराव गायकवाड, कंपनीचे संचालक पद्माकर मोगले, आनंद कांबळे, गणेश कारभारी, भास्कर जाधव, राम सावंत तसेच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश शिंदे, लेखापाल ऋषिकेश मोमले यांनी विशेष परिश्रम घेतले.
या आढावा बैठकीच्या नंतर सर्व अधिकाऱ्यांनी कंपनीच्या एकूण कामकाजाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. कंपनी करत असलेल्या कामाचे कौतुक करून भविष्यात आणखी प्रगती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
