शरद पवारांचा सामाजिक दृष्टिकोन नव्या पिढीने अंगीकारावा – तुकाराम चामले

शरद पवारांचा सामाजिक दृष्टिकोन नव्या पिढीने अंगीकारावा - तुकाराम चामले

उदगीर (एल. पी. उगीले) : राजकारण करत असताना राजकीय भूमिका जरूर सांभाळा, मात्र तत्पूर्वी ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी प्राधान्यक्रम समाजकारणाला दिला, तीच सामाजिक भूमिका खऱ्या अर्थाने परिपक्व राजकारणी व्यक्तिमत्वाकडून अपेक्षित असते. शरदचंद्रजी पवार यांच्या याच धोरण आणि भूमिकेमुळे सर्वसामान्य माणसाच्या हृदयामध्ये त्यांनी आपली जागा निर्माण केली आहे. असे विचार स्वातंत्र्य सेनानी तुकाराम चामले यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथे ॲक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग अँड ट्रीटमेंट संस्था जोधपुर (राजस्थान) येथील तज्ञ डॉक्टरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.

याप्रसंगी जोधपुर राजस्थान येथील तज्ञ डॉक्टर संतोष गोस्वामी, डी के शर्मा, राजकुमार हे मान्यवर उपस्थित होते. तसेच सौ. सुशिलाबाई चामले, डॉ. सुशीलजी चेंबूले, वसंतराव सोनकांबळे, रामकिशन नादरगे, गुडे सावकार, भालचंद्र घोनशिकर, बाबुराव आंबेगाव, विजयकुमार एडले, युवराज कांडगिरे, भूषण कानवटे, कल्पेश नवाडे,मारुती बिरादार, गोविंदराव चामले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना तुकाराम चामले यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्राचे वैभव म्हणून शरदचंद्रजी पवार यांच्याकडे पाहिले जाते. स्व. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जपत असताना महाराष्ट्राचा मान आणि सन्मान देशपातळीवर जपण्याचे काम शरदचंद्रजी पवार हे मोठ्या जिद्दीने करत आहेत. मात्र दुर्दैवाने काही लोक शरदचंद्रजी पवार यांचे पाय खेचण्याचे काम करत आहेत. शरदचंद्रजी पवार हे निष्कलंक आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व आहेत. युवकांनी त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर कायम ठेवावा. यासोबतच ज्या पद्धतीने शरदचंद्रजी पवार साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण, राजकारण, उद्योग, शेती या सर्वच क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्व आहेत. या सर्व क्षेत्रातील लोकांना सोबत घेऊन फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहेत,तो आदर्श जपावा असेही सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक तथा स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबुराव आंबेगाव यांनी केले. आभार प्रदर्शन विजयकुमार येडले यांनी केले.

हे शिबिर सहा दिवस चालणार असून या शिबिराच्या माध्यमातून वेगवेगळ्या समस्या असलेल्या वयोवृद्ध नागरिकांसाठी कमर दुखी, दमा, मधुमेह, मानसिक ताण तणाव, सांध्यातील दुखणे, थायरॉईड्स, लठ्ठपणा अशा विविध आजारांच्या संदर्भात ॲक्युप्रेशर या पद्धतीने उपचार केले जाणार आहेत. या उपचार पद्धतीमध्ये कोणताही साईड इफेक्ट नसल्याचे तज्ञ डॉक्टरांनी सांगितले. उदगीर शहर आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यात सहभाग घेतला आहे.

About The Author

error: Content is protected !!