मुन्ना पाटलांनी विकासाचा इतिहास रचला – राजेश्वर निटुरे
राज्यघटनेवर हात घालून अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीला वेळीच रोखा – मौलाना हबीबुर रेहमान
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली मलकापूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग चार मध्ये क्रांतीनगर भागात मुन्ना उर्फ सिद्धेश्वर पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून हजरत मौलाना हबीबुर रहमान, माजी उपाध्यक्ष फैजूखां पठाण,माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, मंजूर खां पठाण, विजय राजेश्वर नीटुरे, सुभाष धनुरे, मुस्तफा साब, शिवाजी लखवाले, विधिज्ञ अब्दुल करीम साब, आरिफ हाश्मी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना मौलाना हबीबुर रेहमान यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व सामान्य माणसांसाठी समान हक्क देऊन राज्यघटना दिली आहे. मात्र काही लोक राज्यघटनेलाच हात घालून गोरगरिबावर अन्याय, अत्याचार करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करून मत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या गोष्टीचा विचार करून सर्वसामान्य मतदारांनी विकासाची क्षमता असलेल्या मुन्ना पाटील यांच्या पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करावे. आणि दबाव तंत्राचा वापर करणारे, पैशाचा वापर करणाऱ्या शक्तींना त्यांची जागा दाखवावी. मतदान विकणे,विकत घेणे हे मुस्लिम धर्मामध्ये पाप आहे. आज दिलेला पैसा उद्या संपून जातो, मात्र आपल्या आत्म्याला सतत पश्चाताप होत राहतो. या गोष्टीचे गांभीर्य ओळखून विकासाची क्षमता असलेल्या आणि सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन चालणाऱ्या मुन्ना पाटलासारख्या व्यक्तीच्या सोबत राहावे, या निवडणुकीमध्ये विरोधकाची अनामत रक्कम जप्त करा, असेही आवाहन केले.
याप्रसंगी प्रास्ताविक करताना मुन्ना पाटील यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात क्रांतीनगर पासून झाली असून या भागाला आपण कधीच विसरणार नाही. ग्रामपंचायत हद्द मोठी असल्याने विकास कामे करत असताना काही कामे राहिली असतील ती कामे यावेळी पूर्ण करू, असेही आश्वासन दिले. तसेच ग्राम पंचायत साठी कुणाच्या दबावाला बळी न पडता बिनधास्तपणे मतदान करण्याचे आवाहन केले. आणि आपण केलेल्या विकास कामाचा आराखडा सांगितला.
याप्रसंगी विधीज्ञ अब्दुल करीम साहब यांनी स्पष्ट केले की, मुन्ना पाटलांचे पॅनल हे सर्व धर्मसमावेशक असून सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहे. दलित, शोषित, अल्पसंख्यांक लोकांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना खेचून आणण्याची क्षमता मुन्ना पाटलामध्ये आहे. त्यामुळे आपण मुन्ना पाटलांच्या सोबतच राहावे. आणखी निवडणुका संपल्या नाहीत तरी कुठे पोस्टर फाडणे, कुठे दादागिरी दाखवणे. अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचणे गरजेचे असल्याचे सांगितले.याप्रसंगी बोलताना आरिफ हशमी यांनी स्पष्ट केले की, क्रांतीनगर भागातील सर्वसामान्य जनता, गोरगरीब असली तरी आत्मसन्मान जपणारी आहे. त्यामुळे सुखदुःखात जो सहभागी होतो. अशा व्यक्तींच्या सोबत राहणे पसंद करतात. आणि मुन्ना पाटील हे सतत गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटत असतात, असे स्पष्ट केले. “विकासाची खात्री, करेल छत्री” असा नाराही त्यांनी दिला.
याप्रसंगी बोलताना मौलाना अजिम पटेल साब यांनी स्पष्ट केले की, या भागातील जनता कोणाला घाबरत नाही. हे सांगताना ते म्हणाले की, “ना तीर से, ना तलवार से, डरो तो सिर्फ परवरदिगार से”कोणी दबाव तंत्र टाकत असेल तर त्याला वेळीच उत्तर देऊन गप्प करा. मुन्ना पाटलाच्या पॅनलला मतदान म्हणजे विकासाला मतदान होय, असे सांगितले. तसेच मुन्ना पाटील म्हणजे सर्वांचे दुःख ओळखणारा आणि विकासाची क्षमता असलेला माणूस आहे.
अध्यक्षीय समारोप करताना राजेश्वर नीटूरे यांनी स्पष्ट केले की, मुन्ना पाटील यांनी अक्षरशः विकासाचा डोंगर रचला आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये खूप वाढ झालेली असल्याने विकासासाठी उपलब्ध असलेल्या निधीपेक्षाही जास्त निधी लागत असल्याने वेगवेगळ्या नेत्यांकडून विकास निधी आणून त्यांनी मलकापूर ग्रामपंचायत हद्दीत विकास केला आहे. माता भगिनींना पाण्यासाठी वन वन फिरणे लागू नये, यासाठी 16 कोटी रुपयांचा विकास निधी मलकापूर साठी आणला आहे. त्याचेही काम लवकरच सुरू होईल.
यासोबतच इतरही विकास कामे मोठ्या गतीने सुरू असून आपल्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे, अशी तळमळ ठेवणारा नेता तुम्ही घडवणार आहात. याचे भान ठेवून मतदान करा. असे आवाहन केले. दबाव तंत्राचा कदापि वापर करू देऊ नका. कोणालाही घाबरायचे कारण नाही, तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, भाजप असेल ना आणखी कोणी असेल, कोणालाही घाबरायचे नाही. अगदी निर्भीडपणे मतदान करा. आणि मुन्ना पाटलाच्या सर्व पॅनलला बहुमताने विजयी करा. असे आवाहनही राजेश्वर नीटुरे यांनी केले.
