शेणकुड येथील पुलासाठी नितीन गडकरी यांच्याकडून 15 कोटी निधी मंजूर – गणेश हाके यांच्या विनंतीला यश
अहमदपूर (गोविंद काळे) : राज्य महामार्ग क्रमांक 249 वरील मन्याड नदीवरील शेणकुड येथील पुलाचे बांधकाम व खंडाळी- काळेगाव- अहमदपूर रस्त्याच्या कामासाठी प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री मा नितीन गडकरी यांना 25 कोटी निधी मंजूर करण्याबाबत त्यांचे 11.2.2022 चे पत्रान्वये विनंती केली होती, त्यानुसार मा. नितीन गडकरी यांनी 15 कोटीचा सी आर आय एफ फंड मंजूर केला असून सी आर आय एफ निधी मंजुरीचे पत्र नितीन गडकरी यांचे मंत्रालयाने राज्य शासनास पाठवले आहे. शेणकुड येथील मन्याड नदीवरील पूल अत्यंत कमी लांबीचा व अरुंद असून तो खचून गेला आहे त्यामुळे अहमदपूर- काळेगाव -खंडाळी महामार्गावरून जाणाऱ्या जनतेची अडचण होत होती. मन्याड नदीवरील या पुलामुळे अहमदपूर- काळेगाव- शेणकुड- सुमठाणा- टाकळगाव- वंजारवाडी येथील जनतेची सोय होणार आहे. गेली अनेक वर्ष मन्याड नदीवरील या पुलाची रस्ता रुंदीकरणाची जनतेची मागणी होती. खंडाळी- काळेगाव- अहमदपूर अंतर केवळ 12 किमी असून पूल व रस्त्या अभावी खंडाळी- उजना- सांगवी- अहमदपूर असा 18 किमी चा प्रवास करावा लागत होता. जनतेची गैरसोय दूर व्हावी या हेतूने भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी पूल व रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत मा. नितीन गडकरी यांना विनंती केली होती. मा. नितीन गडकरी यांनी हा निधी मंजूर केल्यामुळे ग्रामीण भागातील जनता त्यांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानत आहे.