महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबांना अभिवादन
अहमदपूर (गोविंद काळे) : शिक्षण, विज्ञानवादी दृष्टीकोन, स्वावलंबन व स्वच्छतेचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून देणारे महान कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील महात्मा फुले महाविद्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे होते , तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संतोष पाटील हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. पाटील यांनी गाडगे बाबांच्या जीवन कार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ. चौधरी म्हणाले की, राष्ट्रसंत गाडगेबाबांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक आणि अंधश्रद्धा निर्मूलन विषयक कार्याची समाजाने सतत आठवण ठेवली पाहिजे. गाडगेबाबांच्या विचारांची आज समाजाला प्रचंड गरज निर्माण झालेली आहे, असेही ते आपल्या भाषणात म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मारोती कसाब यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.