औसा तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने आपली प्रतिष्ठा जपली !
लातूर (एल.पी. उगीले) : लातूर जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी निर्विवादपणे आघाडी घेतली आहे. विशेष बाब म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निष्ठा असलेल्या शिवसैनिकांनी गावपातळीवर आपल्या पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चित उल्लेखनीय आहेत. लातूर ग्रामीण, उदगीर, निलंगा आणि औसा तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना काय चमत्कार दाखवणार? अशा पद्धतीची वल्गना विरोधी पक्ष करत असतानाच कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून आपापल्या गावात पक्षाची आणि आपली प्रतिष्ठा जपली आहे.
औसा तालुक्यात ज्या ज्या म्हणून गावात बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. त्या सर्वांचा लातूर जिल्हा संपर्कप्रमुख बालाजी काकडे, जिल्हाप्रमुख विधिज्ञ बळवंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली औसा तालुकाप्रमुख गणेश माडजे यांनी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून यथोचित सत्कार व सन्मान केला.
शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार निश्चितपणे लोकाभिमुख निर्णय घेत आहेत, आणि लोकांना देखील या सरकार बद्दल आदर वाटत आहे. त्यामुळेच सर्वसामान्य जनता सरकारच्या पाठीशी एकजुटीने उभा राहत आहे. असे चित्र लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिसून येत आहेत.
यापुढेही या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी, शोषित, उपेक्षित या सर्वांचे भले करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे औसा तालुका प्रमुख गणेश माडजे यांनी दिली.
या सत्कार समारंभाच्या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार कलमे, ज्येष्ठ शिवसैनिक नवनाथभाऊ भोसले, बालाजी भोंग, औसा तालुकाउपप्रमुख मारुती जाधव, उपतालुकाप्रमुख बळी पवार, भादा सर्कल प्रमुख गोविंद शिंदे, अमोल देशपांडे, औसा शहर प्रमुख बंडू कोद्रे, सतीश कटके, अभिषेक भोंग, समाधान लोखंडे, ज्ञानेश्वर हंताळे, संपत गायकवाड, रवींद्र उबाळे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातील एक आकर्षक आणि उत्कृष्ट अशा पद्धतीचा कार्यक्रम आणि सत्कार समारोह औसा येथे संपन्न झाल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
