देवणी तालुक्यातील परिसरात वेळा अमावस्या उत्साहात साजरी
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध ठिकाणी वेळअमवस्या सण मोठ्या उत्साहात साजरा झाला, काळ्या आईला सजविण्याचा तसेच खाऊ-पिऊ घालण्याचा सण म्हणून गणली जाणारी वेळाअमावस्या साजरी करण्याची परंपरा यंदाही तालुक्यातील शेतकऱ्यांनी जपली. यंदा रब्बी हंगामाच्या प्रारंभाला चांगला पाऊस झाल्याने ज्वारी, गहू, हरभरा शिवाय भाजीपाला ही पिके जोमात असून, हिरवीगार शेती वेळा अमावस्येचा आनंद द्विगुणित करणारी ठरली. यंदा चाराही मुबलक असल्याने पशुपालकही हा सण आपआपल्या शेतात साजरा करताना दिसून आले. शेतातील लक्ष्मीचे डोहाळे जेवण म्हणून ही वेळ अमावस्या खास करून लातूर जिल्ह्यात साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येला ‘येळवस’ असेही म्हटले जाते. दर्श अमावस्या किंवा वेळ अमावस्या ही खरीप पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या असते. या अमावस्याला शेतात कडब्याची खोप करून पांडवांची पूजा करण्याची कर्नाटकातील काही जिल्ह्यात पद्धत आहे. हीच पद्धत कर्नाटकाला निकट असलेल्या लातूर जिल्ह्यासह देवणी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आजही सुरू आहे .
काहीच्या मते ही काळ्या आईची पूजा असते. यावेळी शेतात गावरान मेवा, हरभऱ्याचे डहाळे, वटाण्याच्या शेंगा, बोर, पेरू, ऊस यांचा बहार असतो. त्यामुळे कृषी संस्कृतीमध्ये या अमावस्येला अधिक महत्व आहे. विवाहितेला डोहाळे लागल्यानंतर जे आंबट पदार्थ खावेसे वाटतात, त्या पदार्थांचा या दिवशीच्या स्वयंपाकामध्ये प्रामुख्याने समावेश असतो. बाजरीच्या पिठाचे उंडे, ज्वारीच्या पिठापासून बनविलेले आंबील या खास मेनू बरोबरच भजी, भात, आंबट पदार्थ हा खास मेनू हे आजचे वैशिष्ट्य असते. शेतकरी कुटुंबांनी आपल्या शेतात ज्वारीच्या कडब्याची कोप करून शेतातल्या लक्ष्मीची पूजा केली. यावेळी शेतकऱ्यांचे स्नेही, मित्रगण व आप्तेष्ट मंडळीही आवर्जून उपस्थित होती. यावेळी कडब्याच्या कोपीतील लक्ष्मीची श्रद्धेने पूजा करण्यात आली. गहू, हरभरा, करडी, ज्वारी, आदी पिकांमध्ये चर शिंपून हंगाम चांगला होऊ दे अशी प्रार्थना यावेळी लक्ष्मी चरणी करण्यात आली. यंदाच्या गावरान भोजनात घरगुती पदार्थ, बाजारातील फरसाण, मिठाई, फळे यांचाही या वनभोजनात समावेश दिसून आला. याच बरोबर अनेक ठिकाणी करमणुकीचे कार्यक्रम, महिलासाठीचे खेळ, विविध स्पर्धा असे कार्यक्रम आयोजित केलेले दिसून आले. वेळा अमावस्येनिमित तालुक्यातील जवळपास सर्व बाजारपेठाबंद होत्या.देवणी शहरात रस्त्यावर नागरिकांची ये-जा नव्हती. शहरात सर्वत्र शुकशुकाट अशी स्थिती होती.
तालुक्यातील देवणी शिवारात मल्लीकार्जुन मानकरी, व हंचनाळ येथील शेतकरी राम पांचले, परमेश्वर पांचगे,रमेश पांचले, रमेश गायकवाड, देवणी खु रमेश कांबळे, सरपंच यशवंत कांबळे,रतन गरड चेअरमन, विठ्ठल शिंगडे उपसरपंच, अनिल कांबळे, माजी सरपंच महानंदा मुराळे, प्रशांत रणदिवे,माधव रणदिवे ग्रामपंचायत सदस्य, विश्वनाथ रणदिवे, संग्राम रणदिवे, राजाराम पाटील, दादाराव गायकवाड,बाबु रणदिवे माजी विस्तार अधिकारी, यांच्या शेतात काळ्या आईची सपत्नीक पुजा करुन साजरी केली.
