बुरशीजन्य प्रादुर्भावामुळे तुरीचा झाला खराटा,पंचनामे करून नुकसान भरपाई द्या – चंद्रशेखर पाटील
अतनूर (प्रतिनिधी) : यावर्षी सततच्या पावसाने तूर पिकाला बुरशीजन्य प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे उभे पीक वाळून गेल्याने तुरीचा अक्षरशः खराटा झाला आहे. यात हलक्या जमिनीवरील तूर पिक हातचे गेल्याने खर्चही निघणे अवघड झाले असल्याने शेतकरी धास्तावला असून प्रशासनाने जायमोक्यावर येवून वस्तुनिष्ठ आॕनदस्पॉट पंचनामे करावेत, अशी मागणी जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरातील २२ गाव-वाडी-तांडा-वस्तीतील शेतकऱ्यातून होत आहे.

यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन व तूर पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. मुबलक पाणी व वातावरणामुळे ही पिके चांगली बहरली. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामात अधिकच उत्पन्न होईल, अशी अपेक्षा होती. संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे हाता-तोंडाशी आलेले सोयाबीन हातून गेले. त्यात आता तूर देखील बुरशीजन्य प्रादुर्भावाने वाळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान अतनूर परिसरात यंदाच्या खरीप हंगामात हजोरो हेक्टरवर पेरा झाला. त्यात सर्वाधिक सोयाबीन तर त्याखालोखाल तूर पिकाचा पेरा झाला आहे. संततधार, अतिवृष्टी व शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार ही तूर पिकावर होती. त्यात तूर पीक चांगले बहरले. मात्र हे फुल व फळ धारणावेळी बुरशीजन्य प्रादुर्भावाने उभे पिक वाळत आहेत. सोयाबीन नंतर आता तूर पिकावर अस्मानी संकट आल्याने शेतकरी हाताश झाला आहे. राज्यसरकारने प्रशासन, शासनाकरवी वाळून खराटा झालेल्या तूर पीकांचे त्वरीत पंचनामे करून द्यावेत, अशी मागणी सरपंच चंद्रशेखर पाटील, शेतकरी बी.जी.शिंदे, किशन मुगदळे, छगनसिंग चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष विकास सोमुसे-पाटील, शिवसेनेचे जळकोट तालुका संघटक मुक्तेश्वर पाटील, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष एस.जी.शिंदे, शेतकरी अनिल पत्तेवार, गोपनर, जे.जी.शिंदे, शिवाजी कदम, विजय पाटील, साहेबराव पाटील, कोकणे, रिपाईचे जळकोट तालुकाध्यक्ष विनोद कांंबळे यांनी केली आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक संततधार पाऊस, शंखी गोगलगाय प्रादुर्भाव, अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबीन हातचे गेले. त्यानंतर अतिपाऊस व बुरशीजन्य प्रादुर्भावाने तूर वाळून तुरीचे उत्पादन धोक्यात आल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने तूरीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सरपंच चंद्रशेखर पाटील अतनूरकर, तूर उत्पादक शेतकरी , ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हासंघटक बालासाहेब शिंदे अतनूरकर यांनी केली आहे.
