रस्त्याचे जाळे तयार झाल्यास दळणवळणाला, विकासाला गती येते – आ. बनसोडे

रस्त्याचे जाळे तयार झाल्यास दळणवळणाला, विकासाला गती येते - आ. बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) कोणत्याही प्रदेशाची, विभागाची, शहराची प्रगती होण्यासाठी दळणवळण वाढले पाहिजे. आणि दळणवळण वाढण्यासाठी रस्त्याचे जाळे निर्माण झाले पाहिजे. हा विकासन्मुख दृष्टिकोन ठेवून उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वच बाजूंनी अत्याधुनिक राष्ट्रीय आणि राज्य मार्ग बनवण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. त्यासोबतच चार पदरी वळण रस्ता ही तयार केला जाणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी दिली. ते उदगीर येथील एस.टी. कॉलनी ते तीवटगाळ पर्यंत रस्ता तसेच तीवटगाळ पाटी ते आष्टामोड पर्यंत उर्वरित रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी बसवराज पाटील, दावणगावचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समीर शेख, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, मलकापूरचे सरपंच गुरुनाथ बिरादार, तिवटगाळचे सरपंच प्रशांत पाटील, हैबतपुरचे सरपंच गजानन नरहरे, देवर्जनचे सरपंच अभिजीत साकोळकर, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, श्रीकांत पाटील, मुकेश भालेराव इत्यादी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. बनसोडे यांनी स्पष्ट केले की, उदगीर शहराचा विकास होण्यासाठी रस्ते प्रमुख गरज असल्याने संपूर्ण विधानसभा मतदारसंघात रस्त्याचे जाळे बनवणे सुरू आहे, लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर ही दोन नंबरची बाजारपेठ असून मराठवाड्यामध्ये ख्यातनाम असलेले ऐतिहासिक शहर आहे. उदगीर शहर हे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या चार राज्याच्या सीमेवर असल्यामुळे दिवसेंदिवस दळणवळणाची साधने उपलब्ध करून देणे गरजेचे बनत आहे. त्यातील प्रमुख बाब रस्ता असल्याने रस्ते उत्कृष्ट झाले तर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत नाही, तसेच वाहतुकीची कोंडीही रोखता येते. हा विचार डोळ्यासमोर ठेवून आपण चार पदरी रस्ते मंजूर करण्यावर भर देत आहोत. सर्वसामान्य नागरिकांचे हित झाले पाहिजे, हाच उद्देश आपला असून केवळ विकासासाठी आपली ही धडपड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उदगीर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणि रस्त्यावर होणारी रहदारी, वाहनांची गर्दी विचारात घेऊन उदगीर शहराला नांदेड, बिदर, लातूर, देगलूर या प्रमुख मार्गाला जोडणारे रस्ते दिवसेंदिवस वर्दळचे बनत आहेत, त्यासाठी राजकीय पार्टी पातळीवरचा विचार न करता विकासाचा मुद्दा घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून, राज्यमार्ग आणि राष्ट्रीय मार्गाला मंजुरी मिळवून घेतली आहे. आपल्या विधानसभा मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्य मार्ग आणि राष्ट्रीय मार्गासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी ना. नितीन गडकरी यांचे आभारही व्यक्त केले.
जवळपास 140 कोटी रुपयांचा निधी या उद्घाटन झालेल्या रस्त्यासाठी मंजूर करून आणला आहे. ही बाब निश्चितच उदगीरकरांसाठी अभिमानाची आणि कौतुकाची आहे. सत्ता असो अगर नसो उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव प्रयत्न करू. असे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले. या रस्त्यांचे हे भूमिपूजन म्हणजेच विकासाचे भूमिपूजन आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सय्यद जानीमिया, यांच्यासह शंकर भातमोडे, शिवसेनेचे शहराध्यक्ष मुन्ना पांचाळ, जयसिंग पाटील, प्रकाश हैबतपुरे, सुनील पाटील, महेश बिरादार, शांतू बिरादार, सतीश पाटील, कैलास तवर, देविदास पाटील, रमेश साळुंखे, शेख मेहबूब, शेख परवीन, एकनाथ पाटील, भीमराव पाटील, नागेश गायकवाड, नवनाथ कच्छवे, हिरासिंग पाटील, बालाजी पुरी, अक्षय गायकवाड, छगन चौगुले, छगन तवर, अनिल पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाम डावळे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!