समाजासाठी अहोरात्र राबणाऱ्या पोलिसांच्या घराचा प्रश्न मिटवल्याचे समाधान वेगळेच – माजी गृहमंत्री आ.संजय बनसोडे

समाजासाठी अहोरात्र राबणाऱ्या पोलिसांच्या घराचा प्रश्न मिटवल्याचे समाधान वेगळेच - माजी गृहमंत्री आ.संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीद घेऊन समाजाच्या रक्षणासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या पोलिसांच्या असंख्य अडचणी आहेत. त्या सोडवण्यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्न करत आहोतच, त्याचाच एक भाग म्हणून पोलीस वसाहत, जी कित्येक वर्षापासून पडझड झालेल्या अवस्थेत होती, त्या ठिकाणी नव्याने अद्यावत आणि अत्याधुनिक पद्धतीने दर्जेदार वसाहतीचे काम सुरू केल्याचा मनस्वी आनंद होत आहे. आपण या समाजाचे काही देणे लागतो. ही जाणीव ठेवून काम केल्याचे समाधान काही वेगळेच असते. आपल्या शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून समाजात शांतता टिकवण्याचे काम पोलीस बांधव करत असतात, मात्र त्यांच्या डोक्यात जर चिंता असेल, घराची काळजी असेल तशा परिस्थितीत त्यांची होणारी ओढाताण विचारात घेऊन त्यांना अत्याधुनिक पद्धतीची घरे उपलब्ध करून देण्याचा हा आपला खटाटोप असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस बांधवांच्या निवासाची व्यवस्था व्हावी, म्हणून सतत आपण धडपडत होतो. तब्बल 41 कोटी रुपये मंजूर करून घेऊन आज आपण भूमिपूजन करत आहोत. ही बाब खरोखरच उल्लेखनीय आहे. पोलिसांच्या मानसिक सामर्थ्य वाढीसाठी ही बाब खूप महत्त्वाची आहे, असेही विचार माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीरचे आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधकाम व पोलीस कार्यालय इमारत बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या प्रसंगी बोलत होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन, उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास पाटील, महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे संचालक तथा स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन राष्ट्रवादीचे नेते भरत चामले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख, रामराव राठोड, देविदास कांबळे, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष प्रा. प्रवीण भोळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, देवर्जनचे सरपंच अभिजीत साकोळकर, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, सय्यद जानीमिया, शिवसेनेचे शहर प्रमुख मुन्ना पांचाळ, देवणीचे नगरसेवक अनिल इंगोले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना बनसोडे म्हणाले की, समाजासाठी 24 तास तत्पर सेवा देणाऱ्या पोलीस प्रशासनाला किमान स्वतःच्या घराची तरी काळजी नसावी. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पोलीस स्टेशनच्या परिसरातच दर्जेदार व सर्व सोयींनी युक्त असे वसाहत बांधण्याचे कंत्राट दिले असून भविष्यात लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. पोलीस बांधवांना सुरक्षित घर मिळेल व त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहील. त्यामुळे ते आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहतील, महाराष्ट्रातील पोलीस बांधवांच्या गृहनिर्माणाच्या 128 प्रस्तावातून विशेष बाब म्हणून उदगीर पोलीस वसाहतीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

या वसाहतीसाठी आपण स्वतः डीपीआर तयार करून प्रायव्हेट कन्सल्टिंग नेमून हा प्रस्ताव जलद गतीने मंजूर करून घेतला, त्यामुळेच विशेष बाब म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ही पोलीस अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने बांधकाम व पोलीस कार्यालय इमारत बांधकामाच्या कामास मंजुरी घेतली आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात आज पर्यंत बरेच आमदार होऊन गेले, मात्र पोलिसांच्या प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने कोणी पाहिले नसल्याची खंतही याप्रसंगी बोलताना अनेक मान्यवरांनी बोलून दाखवली. जनतेचे हित आणि संरक्षण करणाऱ्या पोलिसांच्या घराचा प्रश्न निर्माण झालेला होता. जुनी वसाहत पडझड झालेली, मोठे वादळ आले, पाऊस आला तर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचे लक्ष कर्तव्यापेक्षा आपल्या घरी काय होईल? याची चिंता असायची. याही गोष्टीचे गांभीर्य आपण विचारात घेऊनच सलग पाठपुरावा करून सदरील फाईल स्वतः मंत्रालयात घेऊन जाऊन मंजूर करून आणले असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या वर्ष, दीड वर्षात मोठ्या दिमाखात पोलीस वसाहतीची ही इमारत भव्य दिव्य स्वरूपात आणि अद्यावत सर्व सुविधायुक्त पद्धतीने उभा राहील, याची खात्रीही आमदार संजय बनसोडे यांनी बोलून दाखवली. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन, बामणीचे सरपंच राजकुमार बिरादार, राष्ट्रवादीचे उदगीर विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे इत्यादी मान्यवरांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक श्याम डावळे यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!