येशू ख्रिस्ताने प्रेम आणि मानवतेची शिकवण दिली – आमदार बनसोडे

येशू ख्रिस्ताने प्रेम आणि मानवतेची शिकवण दिली - आमदार बनसोडे

लातूर (एल.पी.उगीले) : ख्रिस्त धर्माचे संस्थापक येशु ख्रिस्त यांनी मानवांनी प्रेमाने वागावे, मानवतेचा धर्म पाळावा, शांतता आणि एकात्मतेचा संदेश दिला. हा संदेश समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था, शांतता निर्माण करणारा असल्याने सर्वांसाठीच अनुकरणीय आहे. असे विचार माजी राज्यमंत्री तथा उदगीरचे आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

ते लातूर येथे पवित्र आत्मा सहाय्यक मंडळ व महोवा मिरे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने ख्रिस्त जन्मोत्सव व नाताळ सणाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मकरंद सावे, प्रशांत पाटील, नवनाथ अल्टे, राहुल बनसोडे, पास्टर सुनील रणदिवे, सुनील बसपुरे, चंद्रशेखर पाटील, टिल्लू शेख, विनोद रणसुभे, जहांगीर शेख, बालाजी चौरे, लाला मोरे, किशोर रणदिवे, अनिता रणदिवे, श्वेता रणदिवे, स्नेहा रणदिवे, दिव्या रणदिवे, दीपक ठाकूर, माने ताई, चंदाताई, पास्टर सूर्यवंशी, पास्टर कोकणे, पास्टर विल्सन, मास्टर नवगिरे, पास्टर शिवाजी, मास्टर दादा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन पास्टर सुनील रणदिवे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष यांनी केले होते.

पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले की, भारतामध्ये सर्व जाती धर्माच्या विचारधारा मानल्या जातात. सर्वच धर्म संस्थापकांनी “मजहब नही सिखाता, आपस मे बैर रखना” हाच संदेश दिलेला आहे. ज्या पद्धतीने तथागत भगवान गौतम बुद्धाने “भवतु सब्ब मंगलम” म्हणजेच जगातल्या सर्व प्राणीमात्राचे कल्याण व्हावे. हा संदेश देताना शांतीचा संदेश दिला. तसा संदेश महम्मद पैगंबर यांनी सुद्धा दिला आहे. “इस्लाम” या शब्दाचा अर्थच “शांती” असा होतो. म्हणजेच सर्व धर्म संस्थापकांनी शांततेचा संदेश दिलेला आहे.

येशू ख्रिस्ताने देखील प्रेम, मानवता, शांतता, एकता असा संदेश दिलेला आहे. हा संदेश पाळण्याची आठवण करून देणारा नाताळ हा सण आहे. ज्या पद्धतीने हिंदू धर्मामध्ये दीपावली साजरी केली जाते, त्याच पद्धतीने ख्रिस्त धर्मामध्ये नाताळ साजरा केला जातो. आनंद उत्सव आणि दीपोत्सव हे या सणाचे वैशिष्ट्य असून परमेश्वराचा पुत्र म्हणून येशू ख्रिस्ताने दिलेला संदेश जगातील बहुतांश देशातील लोक पाळतात. येशू ख्रिस्तांचा जन्म इजराइल मधील बेथेल हेम येथे झाला होता. येशू ख्रिस्तांच्या जन्मापूर्वीच गॅब्रियल या देवदूताने मेरी या मातेला सांगितले होते की, तुझ्या पोटी देवदूत जन्माला येईल, असा दृष्टांत दिला होता, तो दृष्टांत सत्य झाल्यानेच येशू ख्रिस्तांना परमेश्वराचा पुत्र असे मानले जाते, अशी आख्यायिका आहे.

जगभर नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अत्यंत आनंददायी अशा या सणाच्या निमित्ताने सर्व ख्रिस्त बांधव एकत्र येतात, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना घरी बोलावून आनंद साजरा करतात. अशाच आनंददायी कार्यक्रमात मला बोलावून माझा सन्मान केल्याबद्दल संयोजकाचे मनःपूर्वक आभार मानतो, असेही आमदार बनसोडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छोटू हिबारे यांनी केले तर आभार प्रदर्शन संयोजक पास्टर सुनील रणदिवे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!