मिळून चौघीजणी… ‘मागत मागत वारी… देवा, आम्ही आलो तुझ्या दारी…!’
प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
तृतीयपंथीयाची माळेगाव यात्रा
लोहा,
शरीराने ही मुलं...पण मनातून आणि डोक्यातून मुली म्हणून वावरणाऱ्या... तृतीयपंथी जत्रेतल्या यात्रेकरू बनलेले आहेत... यात्रे मध्ये -
‘मागत मागत वारी… देवा आम्ही आलो_ _ तुझ्या दारी…!
तवाकृपेच्या भंडाऱ्याने…
भरू दे भंडारी …_
मल्हारीची वारी…_ !!माझ्या मल्हारीची वारी…!!’_
अशा शब्दात खंडेरायाचा गुणगौरव करीत… माळेगावच्या यात्रेमध्ये वेगळाच ‘रंग भरत’ असल्याने… ‘मिळून आलेल्या चौघेजणी’ यात्रेकरूंचे लक्ष वेधून घेताहेत.
समाजामध्ये तृतीयपंथी म्हणून ओळखले जाणारे… व समाजाच्या हीन नजरेला बळी पडणारे …. तृतीयपंथी नेहमीच समाजात उपेक्षेचे ‘धनी’ असतात… उपेक्षेच्या खोलदरीत गेलेले असले तरी या तृतीय पंथीयांनी … आज अनेक क्षेत्रात भरारी घेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे… हे तृतीयपंथी… ना पुरुष आहेत ना महिला आहेत… पण, ते सरपंच बनले आहेत… आमदार होत आहेत…लिंग परिवर्तन करून घेत आहेत…एवढेच नव्हे तर विदर्भातल्या …विजय नावाच्या एका तृतीयपंथीयाने एल. एल. बी. ची पदवी संपादन करून… नामांकित वकील म्हणून प्रसिद्ध आहेत…त्यांचे मूळ नाव विजय असले तरी ते… शिवाणी सुरकर या नावाने नामांकित वकील झाली आहे… देवदास… देवदासी…छक्का… बायल्या…अशा विविध उपरोधिक… शेलक्या… नावाने त्यांची प्रतिमा मलिन करण्यात येत असली तरी… ते स्वकर्तृत्वाने समाजात आपला स्वतंत्र ठसा उमटवत आहेत…हे नाकारता येत नाही.
मुलगा असलेला तृतीयपंथी… मुलींचे नाव धारण करतो… असेच काही तृतीयपंथियांची माळेगावच्या यात्रेमध्ये भेट झाली… त्यामध्ये शिवकन्या केंद्रे हिचे मूळ नाव विठ्ठल केंद्रे हे आहे… तर अनुराधा बंडेवाड हिचे नाव माधव बंडेवाड आहे… नजर भोसले हिचे नाव करण भोसले आहे…. सोनी भिसे हिचे नाव जालिंदर भिसे… असे मूळ आहे…. असे हे तृतीय पंथीयांचे नामकरण झालेले आहे… विशेष म्हणजे यांचाही एक बॉस असतो… नांदेड जिल्ह्यातल्या तृतीय पंथीयाची गौरी बकस ही बॉस आहे…!
हे तृतीयपंथी दहावी… बारावी… बी.ए. आणि एम. ए. झालेले आहेत… यातील अनुराधा बंडेवाड ही कंधार तालुक्यातील घागरदरा येथील असून इतिहास विषय घेऊन…एम.ए.झाली आहे.
या तृतीयपंथीयाचा समाजाला कसलाच त्रास नाही..त्यांना मात्र कधी मधी समाजाचा त्रास असतो…माळेगाव यात्रेत तुम्हाला काही त्रास आहे का…?असे विचारले असता… त्या मधील शिवकन्या केंद्रे म्हणाल्या की, माळेगाव हे उचल्याचं असलं … तरी आम्हाला येथे कसलाही त्रास नाही … कधी कधी आम्हाला आमच्याच लोकांकडून त्रास होतो… आम्हाला जर प्रेम मिळालं तर… आम्हीही पैसे मागणार नाहीत… आम्हीही खंडोबाची भक्त आहोत… मिळून चोघीजणी… यात्रेत आलं की आम्हाला खूप समाधान वाटतं-
‘ मागत… मागत …वारी
आलोदेवा तुझ्या दारी ..! तव कृपेच्या… भंडाऱ्याने_
होऊ दे_ भंडारी …!!!
मल्हारीची वारी …
माझ्या मल्हारीची वारी !!’
अशा लोकगीतातून शिवकन्या केंद्रे हिने माळेगावच्या यात्रेत आपला बेल भंडार उधळला…!
