आ. धीरजभैय्या यांच्या प्रयत्नाला यश, दुसऱ्या टप्प्यात 79 हजार शेतकऱ्यांना लाभ – चेअरमन विवेक पंडितराव जाधव
उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने दाखल केलेल्या प्रस्तावापैकी शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत, प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत जिल्हा बँकेच्या वतीने दाखल केलेल्या प्रस्तावापैकी 79 हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांचे भले व्हावे म्हणून लातूर ग्रामीणचे आ. धीरजभैया विलासराव देशमुख यांनी सतत पाठपुरावा करून शेतकऱ्यांचे कल्याण करणारी योजना यशस्वी केली. अशी माहिती विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गंगापूर, भाकसखेडाचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत दुसऱ्या यादीत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 79 हजार शेतकरी पात्र झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण 83 हजार शेतकऱ्यांपैकी 79 हजार शेतकरी हे केवळ जिल्हा बँकेचे सभासद आहेत. प्रोत्साहन पर लाभ योजनेच्या निकषानुसार सन 2017- 18, 2018- 19 आणि 2019- 20 या तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षात नियमित पीक कर्जाची मुदतीत परतफेड करणारे शेतकरी या योजनेस पात्र ठरणार आहेत. पात्र सभासदांना परतफेड केलेल्या मुद्दला इतपत परंतु जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये पर्यंत लाभ देण्यात येत आहेत, लाभाच्या रकमा संबंधित शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर जमा होणार असल्याची माहिती युवा नेते तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ. धीरजभैया विलासराव देशमुख यांनी दिली असल्याची ही माहिती विवेक पंडितराव जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
शासनाच्या पहिल्या यादीत जिल्हा बँकेचे 39 हजार शेतकरी पात्र झाले होते. त्यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या 37 हजार 400 शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर 118 कोटी 70 लाख रुपये जमा झालेले आहेत. दुसऱ्या यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, बचत बँक खाते पासबुक व यादीतील विशिष्ट क्रमांक घेऊन आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्र व जवळच्या बँक शाखेत जाऊन आपल्या आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. असेही आवाहन लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन तथा लातूर ग्रामीणचे आ. धीरजभैया देशमुख यांनी केले असल्याची माहिती विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गंगापूर भाकसखेडाचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी दिली आहे. तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सर्व चेअरमननी आपल्या गावातील शेतकऱ्यांना या संदर्भात माहिती देऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असेही आवाहन केले आहे.
