देवणी येथील बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावणारच – उपनगराध्यक्ष अमित मानकरी
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : गेल्या कित्येक दिवसापासून देवणी येथे बस स्थानक बांधण्याच्या निमित्ताने पूर्वी जे बस स्थानक होते, ते पाडण्यात आले आहे. गेल्या चार वर्षापासून बस स्थानकाचा प्रश्न प्रलंबित आहे. शासन आणि प्रशासनाकडून म्हणाव्या त्या गतीने हे काम होत नाही. देवणीचे बस स्थानकाचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. परिणामतः बस स्थानकावर ज्या नागरी सुविधा असायला हव्यात, त्या कोणत्याही सुविधा प्रवाशांना उपलब्ध नाहीत. अक्षरशः लघु शंका किंवा शौचालयासाठी प्रवाशांना उघड्यावर जावे लागत आहे. ही शोकांतिका आहे. हे थांबवण्यासाठी देवणीचा लोकप्रतिनिधी या नात्याने आपण न्यायदेवतेकडे न्याय मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावणारा असे उपनगराध्यक्ष अमित मानकरी यांनी सांगितले होते.

त्याप्रमाणे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. एसटी महामंडळाचे मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्याचे मुख्य अर्थसचिव, उपाध्यक्ष ,राज्य परिवहन महामंडळाच्या बांधकामाचे मुख्य अभियंता व विभागीय नियंत्रक यांना प्रतिवादी करून त्यांच्या विरोधात ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेमुळे प्रशासन जागे झाले असून देवणीच्या बसस्थानकाचे काम करण्याच्या अनुषंगाने रीतसर निविदा प्रकाशित करण्यात आल्या आहेत. लवकरच वसस्थानकाचे बांधकाम चालू होण्याची शक्यता आहे, आणि त्याचे सर्व श्रेय उपनगराध्यक्ष अमित मानकरी यांनाच जाते. चार-पाच वर्षांपूर्वी आणि निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना देवनीचे बस स्थानक सुस्थितीत असताना देखील पाडले गेले. त्याच काळात निलंगा व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बसस्थानक पाडले गेले. यांनाही एकाच वेळी मंजुरी मिळते, व एकदाच पाडले जातात. निलंगा व शिरूर आनंदपाल येथील बांधकाम पूर्ण होऊन त्यांचा लोकार्पण सोहळा ही संपन्न होतो, मात्र देवनीच्या बाबतीत सापत्न भावाची वागणूक देऊन, देवनीकरावर अन्याय केला जातो. हा अन्याय आपण सहन करणार नाही.
बिजेपीच्या लोकप्रतिनिधीची देवणी भागावर अवकृपा असली तरीही, आपण आपल्या परीने जनतेची अवहेलना थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची घोषणाही अमित मानकरी यांनी केली आहे. त्यांच्या प्रयत्नाला निश्चितपणे यश येत आहे. सुदैवाने हा प्रश्न लवकर मार्गी लागावा, अशी अपेक्षा देवणीची जनता करत आहे.
