माळेगावातही महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा स्टॉल…!
अहमदपूर (गोविंद काळे) : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेले लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा येथे हजारो वर्षांची परंपरा असलेल्या श्रीक्षेत्र खंडेरायाच्या यात्रेत येथील महात्मा फुले महाविद्यालयाचा सय्यद जाफर या विद्यार्थ्याने आपला ‘स्टॉल’ टाकून ग्राहकांची पसंती मिळवली.यातून फुले महाविद्यालयाने आपले विद्यार्थी सर्व स्त्तरातवर कार्य करणारे आहे हे सिद्ध केले आहे.
माळेगाव यात्रेत दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल होते.या उलाढालीमध्ये छोटे छोटे दुकानदार ते मोठे दुकानदार आणि लाखोंचे घोडे विक्री करणारे घोडे मालक आदींचा समावेश असतो. रस्त्याच्या मध्यभागी व आजूबाजूला दुकानांची दाटी झालेली असते या दाटीमध्येच अहमदपूर येथील शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेले महाविद्यालय व या महाविद्यालयाची सर्व क्षेत्रात असलेले विद्यार्थी हे कसे निपुण आहेत हे या सय्यद जाफरच्या यात्रेतील ‘स्टॉल’ वरून लक्षात येते.
सय्यद जाफर यांच्याशी संवाद साधला असता तो म्हणाला की, मी फुले महाविद्यालयाचा २०२१मधला विद्यार्थी असून बी. ए. ला मला ८०टक्के गुण मिळाले होते. इंग्रजी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र हे माझे विषय होते. महाविद्यालयात असताना पोट भरण्यासाठी कोणत्याही कामाची लाज बाळगायची नसते हे अध्यापना बरोबरच मला प्राचार्य डॉ. वसंत बिरादार डॉ. सतीश ससाणे , डॉ.पी.पी.चौकटे, प्रा. अतिश आकडे, ग्रंथपाल परमेश्वर इंगळे यांनी शिकवले आहे. बी. ए. नंतर एम. ए. करायचे होते पण, ते माझ्या कौटुंबिक जेमतेम परिस्थिती मुळे काही करू शकलो नाही.
मी अहमदपूर येथे गाड्यावरून घरगुती, मुलांच्या खेळणी,इ. साहित्य विकत असतो. माळेगाव यात्रेत मी कंबरपट्टा, (बेल्ट) गाॅगल आणि पाॅकेट आदींची विक्री केली. विक्री जोरदार झाली. सुरुवातीचे दोन दिवस चांगले गेले. नंतर हळूहळू खरेदी मंदावली आहे, असे असले तरी यात्रेतील एकूण १० ते १२ दिवसांचा माझा मुक्काम असून सोमवार पर्यंत यात्रेत थांबणार आहे. विशेष म्हणजे माझ्या या स्टॉलला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले, असे तो म्हणाला.
