महात्मा फुलेच्या एन.एस.एस. मधून ६०० पशुधनाची आरोग्य तपासणी व उपचार
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागाचे विशेष शिबीर तालुक्यातील मौ. रुई- दक्षिण येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली सुरू असून, शुक्रवार दि. ३० रोजी आयोजित करण्यात आलेल्या पशुरोग निदान व चिकित्सा आणि उपचार शिबिरामध्ये ६००पशुधनांच्या आरोग्याची तपासणी करून उपचार करण्यात आले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील डॉ. शिवाजी क्षीरसागर ( सहाय्यक आयुक्त पशुधन), तालुका पशुधन अधिकारी डॉ. कोकणे, तसेच सांगवी येथील पशुधन अधिकारी डॉ. नरवाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मौजे रुई दक्षिण येथे आयोजित करण्यात आलेल्या पशु चिकित्सा व सर्व रोग निदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवून गावातील सहाशेहून अधिक गाई, म्हशी, बैल, वासरे, शेळी, मेंढी आदी ६०० पशुधनांची तपासणी करून विविध रोगांवर उपचार केले.
महाराष्ट्रात सुरू असलेली संसर्गजन्य लम्पी आजाराच्या प्रतिबंध लसीकरण तसेच, खुरांच्या लसी, गर्भधारणेवरील उपचार केले व गोचीड निर्मूलन, डास निर्मूलन फवारणी करून पशु चिकित्सा व सर्व रोग निदान शिबिर यशस्वी केले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.पांडुरंग चिलगर, सहाय्यक कार्य क्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे, कार्यक्रमाधिकारी डॉ. संतोष पाटील, क्रीडा विभाग प्रमुख प्रो. डॉ. अभिजीत मोरे यांच्यासह रुई गावचे सरपंच अशोकराव पाटील, शिवाजी देवकते, श्याम मुकनर,गणेशराव पांचाळ, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत बोईनवाड यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी तसेच ग्रामपंचायत कार्यालय रुई दक्षिण पदाधिकाऱ्यांनी तसेच गावकऱ्यांनी यांनी परिश्रम घेतले.
