वाढवणा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!!
मटका बहाद्दरांसोबत संपणार गुन्हेगारी !!
उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागात नांदेड आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणात जुगारी प्रवृत्तीच्या लोकांसोबत मटका आणि गुटखा जोमाने पसरतो आहे. या गोष्टीचे गांभीर्य वाढवणा पोलिसांनी घेतले असून, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्या सूचनेवरून वाढवणा पोलीस स्टेशनच्या सर्वच बीट आमदारांनी सतर्क होऊन काम करायला सुरुवात केली आहे.
याचाच परिणाम म्हणून एकाच दिवशी अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांना पाबंद करत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. दिनांक 30 डिसेंबर रोजी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास वाढवणापाटी येथील उदगीर– अहमदपूर रोडवर शेतकरी हॉटेलच्या समोर रोडवरील उत्तर बाजूला अंदाजे १५ किलोमीटर अंतरावर, आरोपी कल्याण नावाचा मटका घेत असल्याची गोपनीय माहिती हाती आल्यानंतर त्याची शहानिशा करत घटनास्थळावर पोलीस हवालदार माधव रंगनाथ सारोळे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार धाड टाकली असता, त्या ठिकाणी आरोपी बालाजी नामदेव भंडारपे हा स्वतःच्या फायद्यासाठी कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असताना दिसून आला. मात्र पोलिसांचा आंदाज लागताच तो फरार झाला. घटनास्थळावरून वाढवणा पोलिसांनी कल्याण नावाच्या मटका जुगाराचे आकडे घेतलेली चिठ्ठी, कार्बन कॉपी, पेन आणि नगदी रोख रक्कम 850 रुपये जप्त करून आरोपीच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.
तसेच दुसरा एक आरोपी रसूल बशीर साहब शेख हा महबूबनगर हळी येथे बारा वाजण्याच्या सुमारास टाईम बाजार व श्रीदेवी मटका जुगारावर आकडे लाऊन जुगार खेळत व खेळवत होता.तेथे मटका घेतलेली चिट्ठी, कार्बन प्रत, पेन व रोख रक्कम 960 रुपये जप्त करण्यात आले आहेत. याही संदर्भामध्ये पोलीस जमादार माधव रंगनाथ सारोळे यांच्या फिर्यादीवरून वाढवणा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हळी हंडरगुळी परिसरामध्ये मटका गुटका हे चालू असल्याची कल्पना येताच पोलिसांनी सतर्क होऊन लगेच गुन्हे नोंदवले आहेत.
यासोबतच वाढवण्याचे गावात देखील समद शमशुद्दीन जागीरदार आणि अमन आयुब पठाण राहणार हळी या आरोपीने मिलन नाईट मटका खेळत व खेळवीत असताना पोलीस जमादार बालाजी हुलराम आक्केमोड यांनी याप्रकरणी दिनांक 30 डिसेंबर रोजी सहा वाजण्याच्या सुमारास वाढवना रोड वरील उस्मानिया चिकन बिर्याणी हॉटेलच्या समोर सदरील प्रकार चालू असल्याचे आढळून येताच, धाड टाकून गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस नाईक कलकत्ते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. प्रकारामुळे काही प्रमाणात उघड उघड जुगार खेळणाऱ्या प्रवृत्तीवर आळा बसला आहे. तसेच पोलिसांचे कौतुकही केले जात आहे.
