सुग्या-मुग्यांचे कैवारी… महात्मा फुलें, छत्रपती शाहू, भारत रत्न डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार:भाई डॉ. केशवराव धोंडगे

सुग्या-मुग्यांचे कैवारी… महात्मा फुलें, छत्रपती शाहू, भारत रत्न डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार:भाई डॉ. केशवराव धोंडगे

प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि.लातूर
९८६०१६७९१२

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, माजी आमदार व खासदार, प्रख्यात साहित्यिक, हजरजबाबी, क्रांतीवीर,आजानबाहू,मन्याड खो-यातला ढाण्या वाघ भाई केशवरावजी धोंडगे साहेब महाराष्ट्रातीलच नव्हे तर दिल्लीच्या तख्तालाही सुनावण्याची धमक असलेलं प्रगल्भ आणि स्वच्छ राजकीय व्यक्तिमत्त्व होते. भाईंनी कधीही आणि कोणाचीही मुलाहिजा बाळगली नाही.अगदी सत्तेतील कोणताही व्यक्ती असो.अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दीन,दलित, पीडित, शोषित, आहे रे आणि नाही रे मधील दरी,गुराखी राजे, सुगे -मुगे, माय माऊल्या आदिंचे ते कैवारी होते.
केशवराव धोंडगे यांच्या सत्याग्रहाची पद्धतच वेगळी होती.अहिंसेच्या माध्यमातून रूखवत मोर्चा, लाच देऊ मोर्चा, हागू – मुतू मोर्चा या सारखे हजारो मोर्चे काढून भ्रष्ट अधिकारी, नोकरशाहीला था-यावर आणून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. केशवराव म्हणजे आग्या मोहळ, केशवराव म्हणजे राजकारण, समाजकारण, धर्म कारणातली नीतिमत्ता होती, केशवराव म्हणजे राजकारणातलं सात्विक रूप होतं… राजकारणातल्या बेबंदशाहीला ब्रेक लावणारी मुलुख मैदानी तोफ होती, केशवरावांची अन्यायाविरुद्धची एक डरकाळी सत्तेला डळमळीत करणारी होती.

४०वर्षे राज्यात राजकारणातलं कोरीव लेणं..
भाई डॉ.केशवराव धोंडगे हे स्वातंत्र्य प्राप्ती नंतरच्या काळात म्हणजे… पासून विधान सभेचे सतत ३५वर्ष कंधार मतदार संघाचे भरघोस मतांन निवडून येणारे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार असायचे.एवढेच नव्हे तर ते लोकसभा निवडणुकीतही भरघोस मतांनी निवडून आले आणि आणिबाणीच्या संकट कळात त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सह्याद्रीची ताकत दाखवून दिली.
भाई डॉ.केशवराव धोंडगे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पासून, सुधाकरराव नाईक, शरद पवार आदिंचा काळ त्यांनी आपल्या कर्तृत्वाने, कर्तव्याने आणि खास मन्याड खो-याच्या भाषेतून तर अगदी पुणेरी भाषेलाही मागे टाकणा-या शैलीतून केशवरावांनी सभागृह दाणाणून सोडले.कधी गहिवरून टाकले,तर कधी मनमुराद हसवले तर कधी रडवले तर कधी गंभीर करुन टाकले. तारा़कित प्रश्न उपस्थित करून सभागृहाला समस्या सोडवण्यासाठी कार्य प्रवृत केले.

गुराखी साहित्य संमेलनाचे जनक
भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी जानेवारी १९९० -९१ पासून जागतिक पातळीवरील गुराखी साहित्य संमेलनास लोहा तालुक्यातील मौजे किरोडा येथे त्यांनीच अस्तित्वात आणलेल्या गुराखी गडावर हजारो गुराखी राजेंच्या उपस्थितीत सुरूवात केली. या संमेलनातकामाईच्या मंदिरापासून निघालेली गुराखी दिंडी, रानसाहित्यांनी सजलेले गुराखी पीठ, पशुधन,दूध देणारा मोत्या बैल, गुराखी साहित्य संमेलनाचे मधकवड्यांच्या सांकेतिक भाषेतून होणारे उद्घाटन, अन् केशवरावांचे क्रांतिकारी भाषण, डॉ.निवृती कोंसल्ये यांचे खुमासदार सूत्रसंचालन, रात्री होणारे प्रबोधन अशा अनेक बाबी ह्या संमेलनाचे आकर्षण होते. हे साहित्य संमेलन आताही‌ आहेत‌ ते कधी कोरोना तर कधी आचार संहिता यामध्ये अडकते आहे.
अभिजात प्रतिभेचा परमोच्च आविष्कार होते: भाई धोंडगे
भाई केशवराव धोंडगे यांची साहित्य संपदा विपुल आहे. राम असोत की रामदास यांच्यासह. छत्रपती संभाजी महाराज, गुरू गोविंदसिंग, नानक देवजी, संत सेना न्हावी महाराज, संत चोखोबा, महात्मा उर्लिंग पेद्दी, यांच्या सह अनेक थोर विभुतींवर आपली क्रांतिकारी, तडाखेबाज, बिनतोड, वास्तवाचा तळ गाठून आपल्या धारदार लेखणीला वाट मोकळी करून दिली.त्यांचे लेखन ऐतिहासिक असं होतं.मराठवाडा कारगिल शोर्य गाथा हे रोमांचकारी शैलीतला ग्रंथ वाचल्यानंतर एक मराठवाडा भक्तीची उर्मी दाटून येते.त्यांच्या ५९हून अधिक असलेल्या ग्रंथातून त्यांनी आपले आत्मचरित्र उलगडलेले आहे.
साहित्य सम्राट प्र.के.अत्रे यांचा व केशवराव धोंडगे यांचे विधान सभेतील शाब्दिक कोटी.शाब्दिक संघर्ष हा सर्व श्रुत आहे. एलिझाबेथ राणी च्या कानाला ‘भोक’ की ‘छिद्र’ या वर भाई केशवराव धोंडगे यांनी सुचवलेला शब्द अखेर प्र.के.अत्रे यांनी मान्य केला होता,असे हे भाषेवर प्रभुत्व असलेले केशवराव होते.
ते विचाराने डावे.समाजवादी असले तरी त्यांनी पूर्ण भारत पायाखाली घालून धार्मिक क्षेत्रातील कर्मकांडाची चिरफाड केली. तसं लेखन केले. दरवर्षी पंढरपूरला संस्थेची समता दिंडी घेऊन जायचे. वारकऱ्यां बद्दल त्यांना कळवळा होता.
मातोश्री मुक्ताई हेच दैवत
भाई डॉ. केशवरव धोंडगे यांचं आराध्य दैवत मातोश्री मुक्ताई ह्याच होत्या.आईच्या प्रेरणेतून त्यांनी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारची स्थापना केली. वाडी तांड्यातील मुलांना घरातल्या दुरडीतली भाकर खाऊन शिकण्याची व्यवस्था करण्याची मातोश्रीची इच्छा होती. ती त्यांनी पूर्ण केली. शेवटच्या श्वासापर्यंत नित्य नियमाने मातोश्रीच्या समाधीचे दर्शन ते घेत होते.मातोश्री हा त्यांचा श्वास होता. त्यांचं दैवत होतं. तेवढीच त्यांची कै. संत नामदे महाराज उमरज, योगीराज निवृती महाराज पेंडू, ह. भ.प. मारोतराव महाराज दस्तापूरकर यांच्यावरही श्रद्धा होती.
भाई केशवराव यांना पंजाराव देशमुख कृषी विद्यापीठाने डी. लिट. ही मानद पदवी देऊन गौरव केला होता. केशवरावजींनी कृष्ण जन्माष्टमी, शिवजयंतीचे सातत्याने आयोजन केले. गुराखी, दीन दलित, तळागाळातील सर्व सामान्य जनता हाच त्यांचा सन्मान होता.त्यांना पाहिलं की भाई केशवराव धोंडगे यांच्यात नवचैतन्य संचारत असे.
भाईंना भेटणारी व्यक्ती कोणतीही असो, कोणीही असो त्यांचं अत्तर तेल लावून स्वागत करणे, त्याचा मायेनं आई जशी पापा घ्यावी तसा दोन्ही बाजूंनी पापा ते घेत असत. त्या़चा सहवास म्हणजे सुगंधी सहवास होता. मंतरलेला सहवास होता. प्रसन्न करणारं सान्निध्य होतं. क्रांतिकिरी सान्निध्य होतं. वयाच्या१०३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाई केशवराव धोंडगे हे राजमाता जिजाऊ, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत गाडगे महाराज , विनोबा भावे यांच्या विचारांचे वारसदार होते.हे समाज सुधारक जसे महाराष्ट्राच्या इतिहासात जसे अजरामर झाले तसे पुढील हजारो वर्षे ते अजरामर राहणार आहेत. राहतील.
आज गुराखी राजांचा,सुग्या मुग्याचा, मराठवाडा सह महाराष्ट्राची बुलंद तोफ, सत्याग्रहाचा बादशहा,लेखणीचे सम्राट, थोर समाजसुधारक, मातृभक्त, शिक्षणतज्ज्ञ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, महाराष्ट्राचं जाणतं वैचारिक नेतृत्व ,मन्याड खो-यातला ढाण्या वाघाची डरकाळी कायमची शांत झाली.गुराखी राजा,मन्याड खोरं, महाराष्ट्र, पशुधन धाय मोकलून आपला आक्रोश करत आहेत.
त्यांना किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…!

About The Author

error: Content is protected !!