रुई (द) जि. प. शाळेत वृक्षारोपणाने प्राचार्य डॉ.वसंत बिरादार यांचा वाढदिवस साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, समीक्षक तथा ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचा वाढदिवस येथून जवळच असलेल्या रुई दक्षिण गावातील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सात दिवशीय निवासी युवक शिबिर सुरू असून, या शिबिराच्या निमित्ताने विद्यार्थी व प्राध्यापकांच्या वतीने तसेच जिल्हा परिषद शाळेच्या वतीने येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर मु. अ. सूर्यकांत बोईनवाड यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण करून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत बोईनवाड यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच महात्मा फुले महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
