उदगीर शहर आणि परिसरात चोरट्यांचा हैदोस, लाखोंचा एवज लंपास!
उदगीर (एल पी उगिले) : उदगीर शहर आणि ग्रामीण भागात अवैध धंद्याच्या पाठोपाठ आता चोरट्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. एकापाठोपाठ एक चोऱ्या सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोऱ्यांची जणू मालिकाच सुरू झाल्याने, पोलीस यंत्रणेवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायची वेळ आली आहे.
पोलीस प्रशासनाचा जनतेवरील आणि गुन्हेगारावरील वचक संपल्यामुळे किंवा पोलीस कुठेतरी लाचार बनत चालल्यामुळे गुन्हेगार गुन्हे करायची हिंमत करत आहेत. उदगीर शहरातील एका मटक्याच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धाड टाकली असता, ते आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कर्मचाऱ्यांनाच दटावत होते! ही हिंमत कुठून आली? उदगीर शहरातील मटका बहाद्दरावर छापा टाकण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला येण्याची वेळ काय यावी? स्थानिक पोलीस केवळ आदर्शवादाच्या गप्पा मारत असले तरी, सर्व अवैध धंदे अलबेला आहेत. त्याचेच उदाहरण म्हणून या मटक्याच्या धाडीकडे पाहता येईल, एकंदरीत उदगीर शहरात अवैध धंदे बोकाळत आहेत, किंबहुना चांगलेच बाळसे धरत आहेत! अशा परिस्थितीत कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याची नितांत गरज आहे.
उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये परवाच पिंपरी या ठिकाणी चोरी झाली होती. त्या पाठोपाठच आता पुन्हा शहरातील मित्र नगर मधील एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले रोख रक्कम चार लाख रुपये आणि 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असले तरीही उदगीर शहर आणि ग्रामीण भागात वारंवार होणाऱ्या चोऱ्या, मारामाऱ्या, घरफोड्या, दुकान फोड्या यामध्ये होत जाणारी वाढ लक्षणीय आहे.

परवाच उदगीर शहरालगत असलेल्या पिंपरी येथे अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करून चार लाख सात हजार रुपयांचा एवज लंपास केल्याची घटना नागरिक विसरतात न विसरतात तोच, पुन्हा चोरट्यांनी उदगीर शहरातील उदय पेट्रोल पंपच्या पाठीमागे असलेल्या मित्र नगर येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी धनाजी विठ्ठलराव राजे यांच्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला, आणि किचन रूम मध्ये असलेल्या कपाटात ठेवलेले रोख रक्कम चार लाख रुपये, तसेच दहा ग्रॅमची सोन्याची अंगठी, पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि तीन ग्रॅमची सोन्याची नथ असे 50 हजार रुपये किमतीचे एकूण 18 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख पन्नास हजार रुपयांचा एवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.
याप्रकरणी फिर्यादी धनाजी विठ्ठलराव राजे यांच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गु. र. न. 12/23 कलम 457, 380 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक बनसोडे हे अधिक तपास करत आहेत.
गुन्ह्याचे प्रमाण सतत वाढत चाललेले असले तरी, तपासाच्या नावाने बोंबाबोंब चालू असल्याची सर्रास चर्चा आहे. संवेदनशील असलेल्या उदगीर शहरात कर्तबगार पोलीस अधिकारी गरजेचे आहेत. अशी ही मागणी नागरिकांतून होत आहे.
