वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवा

वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवा

राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लातूर (प्रतिनिधी) : ज्या नागरिकांचे, व्यावसायिकांचे वीज बिल थकीत आहे अशा ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सवलत न देता महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून थेट कनेक्शन कट केले जात आहे, हे तात्काळ थांबविण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मागील वर्षभरापासून संपूर्ण जगभरासह महाराष्ट्र आणि लातूर जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य नागरिक, छोटे मोठे व्यावसायिक यांची आर्थिक घडी विस्कटली आहे, शेतकरी यांची ही अवस्था बिकट झाली आहे, त्यात सरकारच्या प्रतिनिधी यांच्याकडून मागील वर्षीच्या बिलामध्ये सवलत देण्यात येईल अशा प्रकारची वल्गना करण्यात आल्या, पुन्हा शब्द फिरविले गेले, यात सर्वांच्याच वीज बिलांची थकबाकी वाढत गेली, आता कुठे मार्केट सुरळीत होत असताना ही बिले भरण्यासाठी किमान सवलत तरी मिळावी अशी अपेक्षा असताना मात्र महावितरणचे कर्मचारी थेट कनेक्शन कट करत आहेत हे थांबवावे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात येऊन यानंतरही थकीत बिलासाठी नागरिकांना वेठीस धरत असल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष दादासाहेब करपे,मेनोद्दीन पटेल, गजानन माने,भागवत खंडापुरे, मुळे, विठ्ठल भांदर्गे, वैभव कांबळे,विक्रांत मुळीक, भागवत गुळबिले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About The Author