कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे – राज्यमंत्री संजय बनसोडे

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे - राज्यमंत्री संजय बनसोडे

लातूर/उदगीर (प्रतिनिधी) : राज्यात व आपल्या लातूर जिल्ह्यासह उदगीर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणाना विशेषता आरोग्य यंत्रणेने सज्ज राहण्याचे निर्देश राज्याचे पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.

राज्यात व जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव परत वाढत आहे. उदगीर शहरात मागील आठवड्यात संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उदगीर येथील विश्रामगृह येथे राज्यमंत्री बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. राज्यमंत्री बनसोडे पुढे म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील मागील काही दिवसात कोरोना चा प्रादुर्भाव अधिक गतीने वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रशासनाने मास्कची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी. प्रशासनाला कठोर निर्णय घेण्याची वेळ आली तरी प्रशासनाने या कुचराई करू नये असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

या बैठकीत उदगीर येथील दवाखान्यातील उपलब्ध बेड तसेच अँक्किसजनची उपलब्धता याचा आढावा घेण्यात आला. तसेच लसीकरण मोहीमेचा वेग वाढविण्यात यावा असे निर्देश ही श्री. बनसोडे यांनी दिले. या बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, डॉ. सतीश हरिदास, वैद्यकीय अधीक्षक डॉ.पवार, कोरोना नोडल अधिकारी डॉ .देशपांडे, डॉ.बालाजी भोसले इत्यादी उपस्थित होते.

About The Author