शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी मुक्तपणे मराठी साहित्याचे वाचन करावे – प्रा.ललिता गादगे
अहमदपूर (गोविंद काळे) : बाल वयात विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना अभ्यासासोबत मराठी साहित्यातील कर्तृत्वान महिला व पुरुषांच्या प्रेरणादायी चरित्राचे वाचन अग्रक्रमाने करावे असे जाहीर आवाहन सुप्रसिद्ध साहित्यिका तथा लेखिका ललिता गादगे यांनी केले. त्या दि. 30 रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा च्या समारोप प्रसंगी आणि हुतात्मा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव तथा प्राचार्य रेखाताई तरडे- हाके, व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून इनरव्हील क्लबच्या कोषाध्यक्षा शिल्पा हंगरगे, महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव श्रृंगारे, लीनेस क्लबच्या अध्यक्षा मीना तोवर सह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी लेखिका ललिता गादगे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी दिसामासी काहीतरी वाचा आणि निरंतर लिहीत चला, थोरामोंठ्यांचे विचार आत्मसात करा, व्यसनापासून दूर राहा, मोबाईलचा वापर कमी करा, संगत चांगल्या मित्रांची करा, दैनंदिनी लिहा. असे सांगून शाळेच्या सर्व बहुआयामी उपक्रमाचे त्यानी तोंड भरून कौतुक केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्या रेखाताई तरडे- हाके यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी सूत्रसंचालन मराठी च्या शिक्षिका संगीता आबंदे यांनी तर आभार मीना तौर यांनी मानले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये मराठी विभागाच्या वतीने निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, गीतगायन, चित्रकला, रांगोळी, स्वरचित काव्यवाचन, कथाकथन स्पर्धेतील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त व्याख्यान, पुस्तक परिचय, लेखक- कवी मुलाखत घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी कवयित्री ललिता गादगे यांची ही मुलाखत घेतली. कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर माऊली व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. हुतात्मादिनानिमित्त 11.00 वाजता दोन मिनिटांचे मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली. तर सोहळ्याचा समारोप मी भारतीय आहे या गीताने व पसायदानाने करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
