ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी भोळ !!
तपासात आहे म्हणे नुसता घोळ !!
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भोळ यांनी तपासामध्ये घोळ केल्यामुळे वेळेत दोषारोपपत्र कोर्टात दाखल झाले नाही. इतकेच नाही तर सतत आरोपींना पाठराखण केल्यामुळे त्या आरोपीकडून आपल्याला त्रास होत असल्याची फिर्याद अरुण वामनराव उजेडकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 21 डिसेंबर 2021 रोजी अरुण उजेडकर यांच्या फिर्यादीवरून गोविंद सोमवंशी, सिद्धार्थ सोमवंशी, अविनाश सोमवंशी, गौतम सोमवंशी, चंद्रदीप सोमवंशी इत्यादींच्या विरोधामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा र. क्रमांक 542 /21 कलम 307, 323, 504, 143, 147, 148, 149 भारतीय दंड विधान संहिता सह कलम 135 मुंबई पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यात आरोपी यांनी फिर्यादीस दगड, विटा, कुऱ्हाड अशा हत्याराने जबर मारहाण केली होती. मात्र या प्रकरणी पोलीस प्रशासनाने म्हणावे ते गांभीर्य न घेतल्याने फिर्यादीला याचा त्रास झाला. यासंदर्भात फिर्यादी अरुण उजेडकर यांनी दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना अर्ज करून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भोळ यांची उच्चस्तरिय चौकशी करून तात्काळ निलंबित करावे. तसेच माझ्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने झालेल्या हल्ल्याचा तपास करून योग्य कारवाई करावी. अन्यथा पोलीस उपाधीक्षक उदगीर कार्यालयासमोर कुटुंबासह अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले आहे. सदरील निवेदनाच्या प्रती पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी उदगीर, तहसीलदार उदगीर, पोलीस उपविभागीय अधीक्षक उदगीर यांना दिलेले आहेत.
